शिक्रापूर (प्रतिनिधी) – देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना आणि त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेले आहे, यापूर्वी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे येथे काही इसमांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर शिरूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली असताना आता शिक्रापूर येथे मुंबई हून आलेल्या एका इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून आता पुन्हा शिरूर तालुका हादरून गेला आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील कामानिमित्ताने घाटकोपर मुंबई येथे राहणारे कुटंब शिक्रापूर राऊतवाडी येथे आले होते, यावेळी सध्या कोरोना बाधित आढळून आलेला व्यक्ती हा २० मे रोजी कुटुंबियांना सोडून पुन्हा मुंबई येथे गेला होता. त्यांनतर दोन दिवसांनी पुन्हा शिक्रापूर येथे आला, त्यांनतर सदर इसमाच्या वडिलांना काही त्रास होऊ लागल्याने त्यांनी २४ मे रोजी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय गाठले तेथून त्यांना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.
नंतर ससून रुग्णालयातून त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, दरम्यानच्या काळामध्ये सध्या बाधित झालेल्या त्यांच्या मुलाला देखील त्रास जाणवू लागल्याने त्याने स्वतः रुग्णालयात दाखल होऊन तपासणी केली असताना त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनतर संपूर्ण शिक्रापूर व परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती प्राप्त होताच शिरूर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने शिक्रापूर राऊतवाडी परिसरात शिक्रापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून फवारणी सुरु केली. तसेच या युवकाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.
इसमाच्या संपर्कातील पाच जण क्वारंटाईन
शिक्रापूर ता. शिरूर येथील कोरोना बाधित इसमाच्या संपर्कातील पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी घाबून न जाता योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
एन आय व्ही चा अहवाल येणे बाकी
शिक्रापूर ता. शिरूर येथील इसमाचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्या हेतूने सदर परिसरात उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र सदर इसमाचा तसेच त्याच्या वडिलांचा एन आय व्ही ( राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ) चा अहवाल येणे बाकी आहे. त्यांनतर काय ते स्पष्ट होईल असे तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले.
– डॉ. प्रज्ञा घोरपडे ( वैद्यकीय अधिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र )