मतदारसंघातील प्रश्‍न सोडवण्यासाठी बूथ कमिट्यांचा वापर करणार : आ. पवार

कर्जत (प्रतिनिधी)- तालुक्‍याच्या विकासाचा रोडमॅप मांडताना आगामी काळात जी गणिते होतील ती जनतेच्या हिताचीच असतील. मतदारसंघातील प्रत्येक गावाचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी गावागावात बूथ कमिटीचा वापर केला जाणार आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाचे लोक त्यात असतील.बूथ रचना ही फक्त राजकारणासाठी नसून विकासाचे काम करण्यासाठी असेल. युवक, पुरुष, महिला,युवती असे चार बूथ केले जातील असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले. कर्जत येथे आयोजित बूथ कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, बबनभाऊ नेवसे, अशोक जायभाय, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड, श्रीहर्ष शेवाळे, सुनील शेलार, विजय मोढळे, श्‍याम कानगुडे, दिलीप जाधव, सचिन सोनमाळी, ऋषीकेश धांडे यांच्यासह राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आ रोहित पवार म्हणाले, या निवडणुकीत सर्व जातीधर्माच्या लोकांनी मते दिली आहेत. जाती धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाणार नाही. बारामतीमध्ये ज्याप्रमाणे विकास केला, त्याच धर्तीवर कर्जत जामखेडमध्ये विकास केला जाणार आहे. भविष्यात विकासाच्या मॉडेलचा हा मतदारसंघ असेल. मतदारसंघातील रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार असून कुकडी घोडचे पाणी नियमित मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्जत शहरात गोदड महाराज गल्लीजवळ संपर्क कार्यालय सुरू केले जाणार आहे.

सत्तास्थाने हस्तगत करणार
कर्जत -जामखेड नगरपंचायतीमध्ये आपल्याला सत्ता आणायची आहे. एक वर्षात बऱ्याच निवडणुका होणार असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व ग्रामपंचायती आपल्याला ताब्यात घ्यायच्या आहेत. विकास हा केंद्रबिंदू मानून हे सर्व साधायचे आहे अशी स्पष्टोक्ती आ. रोहित पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.