मनाची शक्ती प्रचंड असते, मानसिक विकासामध्ये मनाची शक्ती कार्यरत असते, हे आता मानसशास्त्रीय अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. विज्ञानवादी लेखक व संमोहनशास्त्रतज्ज्ञ प्राचार्य डॉ.अजित यादव यांचे ‘मन व मनाची शक्ती मिळविण्याचे मार्ग’ हे पुस्तक नुकतेच स्वरूप प्रकाशन, पुणे या संस्थेने प्रकाशित केले आहे.
खरं तर मानवी जीवनात मनाची शक्ती सर्व व्यक्तिमत्त्व व्यापून टाकत असते. मानसिकदृष्ट्या मन आणि मनाची शक्ती यांचा मानवाच्या शरीरावर परिणाम होत असतो. तसेच बौद्धिक क्षमता व बौद्धिक विकास या महत्त्वाच्या बाबी मनावरच अवलंबून असतात, हे आता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
मनाची शक्ती समजून घेणे, ती जागृत करणे, तिचा आपल्या दैनंदिन जीवनात व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक तेथे उपयोग करून घेणे हे मानवाचे ध्येय असले पाहिजे, हे जर आत्मसात केले तर प्रत्येक व्यक्तीला त्याचा सर्वांगीण विकास साधता येतो, हे सविस्तरपणे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या पुस्तकात डॉ.यादव यांनी सांगितले आहे. उपरोक्त पुस्तकातील एकूण आठ प्रकरणांतून मन आणि मनाची शक्ती याविषयी सविस्तर विवेचन लेखकांने केले आहे.
मनाचा शोध व काही सत्य घटना या पहिल्या प्रकरणात मनाच्या गुणधर्माची व वैशिष्ट्यांची चर्चा करण्यात आली आहे. लेखक स्वतः संमोहनशास्त्रतज्ज्ञ असल्याने त्यांना आलेल्या अनुभवावरून काही सत्य घटना वाचकांना या प्रकरणात ज्ञात करून दिल्या आहेत.
माणसाचा मेंदू व मन या प्रकरणात मानवी मेंदूचे विविध भाग, मेंदूचे कार्य, मनाची प्रचंड शक्ती यांचे वैज्ञानिकदृष्ट्या साधार विवेचन केले आहे. मज्जारज्जू ही एक संपूर्ण राज्यव्यवस्था मानली तर मेंदू हा मज्जारज्जूचा राजा आहे, यांचे स्पष्टीकरण दिले आहे. ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ ऑटो लोव्ही, फ्रेंच मानसशास्त्रज्ञ पाॅल बोक्रा, जर्मन शास्त्रज्ञ व्हर्निके, इटलीचा कॅमेलो गोल्गी, स्पेनचा कहाल, मैनार्ड सायमन ड्यू पुई, पोर्तुगीज न्युराॅलाॅजिस्ट इगास मोनिज, नोबेल पारितोषिक विजेते बेंड जाॅन्सन यासह अनेक शास्त्रज्ञांनी मेंदूसंबंधी केलेल्या संशोधनाविषयीची लेखकाने अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
मानवी मेंदू न दिसणाऱ्या मनाकडून काम करण्याची प्रेरणा घेतो, मेंदू दाखवता येतो, पण मन दाखवता येत नाही, या मनाचे वैज्ञानिक स्वरूप व कार्ये, सिग्मंड फ्राईड सारख्या मानसतज्ज्ञ तथा शास्त्रज्ञाने मनाचे केलेल्या संशोधनानुसार अत्यंत शास्त्रशुद्ध माहिती लेखकाने या प्रकरणात करुन दिली आहे.
मन व त्याचे स्वरूप या प्रकरणात मनाचे बाह्यमन व अंतर्मन यांचे स्वरूप विशद केले आहे. बाह्यमनामुळे अनेक कामे केली जातात व व्यक्तीचा विकास होतो, अंतर्मन व्यक्तिमत्व विकासात किंवा व्यक्तिमत्व बिघडविण्यात कारणीभूत असते, ते कसे याचे संशोधन सिग्मंड फ्रॉइड ह्या ऑस्ट्रियन मज्जाशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञाने केले आहे, याने विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले आहे. त्याचे विचार या प्रकरणात सविस्तरपणे लेखकाने मांडले आहेत.
‘मनाची शक्ती व ती मिळविण्याचे मार्ग’ या प्रकरणात संमोहन (हिप्नाॅटिझम), योगनिद्रा हे मनाची शक्ती वाढविण्यासाठी कसे उपयोगी आहेत, याचे शास्त्रशुद्ध विवेचन केले आहे, हे करताना मेस्मर, फ्राईड यांचा संशोधनात्मक अभ्यास व निष्कर्ष याची सविस्तर माहिती करून दिली आहे. अशाचप्रकारे मनाची शक्ती वाढविण्यासाठीचे इतर मार्ग अर्थात मानसिक क्षमतेच्या गुणकांना कार्यक्षम करणे, स्वयंसूचना, मनाची अल्फा अवस्था, अतिंद्रिय शक्तीचा विकास याची माहिती सुद्धा स्वतंत्र प्रकरणांतून करून देण्यात आली आहे.
संमोहन शास्त्र ही मानसशास्त्राची एक शाखा आहे, मानसशास्त्र हे जरी मानवी वर्तनाचे शास्त्र असे मानले जात असले तरी बाह्य वर्तनाशिवाय काही अंत:प्रेरणा मानसशास्त्राने मान्य केल्या आहेत. संमोहनाचा उपयोग मानसिक व्याधी कमी करण्यासाठी आहे, त्यामुळे त्याचा उपयोग विविध क्षेत्रांत होत आहे. अतिंद्रिय शक्तीचे मानसशास्त्र या विषयावर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. या सर्वांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून लिहिलेले हे पुस्तक निश्चितच सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर घालणारे असून मन आणि मनाची शक्ती मिळविण्याचे मार्ग दाखविणारे आहे. तसेच ते प्रत्येकांनी स्वतः कडे संग्रही ठेवावे असे आहे.
– सुनीलकुमार सरनाईक (पुस्तक परीक्षक)
– मन आणि मनाची शक्ती मिळविण्याचे मार्ग
लेखक: डॉ.अजित यादव, कोल्हापूर
मोबाईल -९८८१०३१९३९
प्रकाशक: सुरेश शिंदे, स्वरुप प्रकाशन, पुणे – ४११००२
मोबाईल – 9921077657
पृष्ठे -१७६ किंमत ₹.२००/-