-शर्मिला जगताप
मनोरंजन आणि ज्ञानासाठी आपण वेळात वेळ काढून पुस्तके वाचतो. मात्र, खऱ्या आयुष्यात आपण रोज आर्थिक तंगीला सामोरे जात असतो तरी आपण पैशाचा कधी अभ्यास करीत नाही.
“खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी लागेल आणि चांगला पगार मिळेल,’ असे जवळपास सर्वच मध्यमवर्गीय आणि गरीब पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासून शिकवण देत असतात, त्यामुळे आपण मोठेपणी नोकरी करू अशीच विचारसरणी तयार होते, मात्र रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात श्रीमंत वडील आपल्या पाल्यांना जे शिकवतात त्या सल्ल्यामुळे ही मुले मोठे व्यावसायिक होऊन दुसऱ्यांना नोकरी देतात. हा व्यावहारिक रोकडा हिशेब आणि जीवन जगताना पैशाला असलेले महत्त्व हे पुस्तक शिकविते.
गरीब माणसे पैशाची बचत करतात. त्यामुळे त्यांच्याकडे थोडीफार बचत उरते. मात्र श्रीमंत माणसं त्यांच्याकडच्या पैशाला कामाला लावतात. म्हणजे ते पैसे उद्योगधंद्यात गुंतवतात आणि आणखी पैसे कमावतात. गरीब माणूस आजही गरीब राहिला आहे, तर श्रीमंत माणूस आणखी श्रीमंत होतोय तो यामुळेच. यातील एक प्रसंग खूपच प्रभावीपणे मांडला आहे. एक तरुण तडफदार पत्रकारिता केलेली तरुणी लेखकाकडे तिने लिहिलेले पुस्तकाचे कच्चे मॅटर वाचण्यासाठी देते आणि चांगली लेखिका होण्यासाठी काही सूचना द्याव्यात अशी विनंती करते. लेखक तिला मार्केटिंगचे नॉलेज द्यायला सुरुवात करतात.
काही वेळाने ती कंटाळते आणि लेखकाला मध्येच थांबवून विचारते की, मला माझ्या पुस्तकाविषयी अभिप्राय हवा आहे, तुम्ही मला पुस्तकाच्या मार्केटिंगबाबत का सांगत आहात. तेव्हा लेखक तिला समजावितात की, व्यवसायात उतरायचे असेल तर चांगल्या पुस्तकासोबत मार्केटिंगचीही जोड दिली तरच तुझे पुस्तक व्यावसायिक दृष्टिकोनातून विकले जाईल, नाहीतर तुझ्या शंभर-दोनशे कॉपीसुद्धा विकल्या जाणार नाहीत, त्यातीलच तुला तुझ्या नातेवाईक, मित्रपरिवाराला काही कॉपी भेट देण्यातच जातील म्हणजे तू एवढे छान पुस्तक लिहिले आहेस त्याला जर ग्राहकच मिळाला नाही तर तुझे पुस्तक दुकानात एका कोपऱ्यात पडून राहील. लेखक तिला सांगतात की माझ्या पुस्तकावर “बेस्ट सेलर’ असा शिक्का आहे, बेस्ट रायटर असा नाही. त्यामुळे तू तुझ्या पुस्तकाचे योग्य मार्केटिंग केले तरच तुझ्या ज्ञानाला योग्य मूल्य प्राप्त होईल.
काही पुस्तके आपण जीवन कसे जगावे, हे शिकवतात. त्यातील एक पुस्तक म्हणजे रॉबर्ट टी. कियोसाकी यांचे रिच डॅड पुअर डॅड. हे पुस्तक मूळ इंग्रजीत असून अभिजीत थिटे यांनी मराठीत अनुवादित केले आहे. जगातील एक उच्च खपाचे हे पुस्तक असून पैशांबाबत लोकांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी फायदेशीर ठरले आहे.
हे पुस्तक म्हणजे चटकन श्रीमंत होण्याचा मंत्र नाही. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आर्थिकबाबी जबाबदारीनं कशा हाताळायच्या हे सांगतं. पैशांवर प्रभुत्व मिळवून मालमत्ता वाढवायला हे पुस्तक शिकविते. तुम्हाला तुमची आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पुस्तक म्हणजे प्रॅक्टिकल वर्क आहे.