काबूल – अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतातील मशिदीमध्ये शुक्रवारी नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून स्थानिक मौलवीसह 12 जण जखमी झाले आहेत. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.
– काबूल रुग्णालयाबाहेर स्फोट
दरम्यान, मंगळवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील लष्करी रुग्णालयासमोर नागरिकांना लक्ष्य करत बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. तालिबानचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी असोसिएटेड प्रेसला यासंदर्भात माहिती दिली होती. ते म्हणाले, काबुलमधील सरदार मोहम्मद दाऊद खान मिलिटरी हॉस्पिटलच्या बाहेर नागरिकांना लक्ष्य करणारा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. इस्लामिक स्टेटच्या सैनिकांनी रुग्णालयाबाहेरही गोळीबार केला असल्याचे सांगण्यात आले.
– ऑक्टोबरमध्ये शिया मशिदीत स्फोट
उत्तर अफगाणिस्तानमधील शिया मुस्लिम मशिदीत नमाज पठण करत असताना 8 ऑक्टोबर रोजी बाॅम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 46 लोक ठार तर अनेकजण जखमी झाले होते. इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाने मशिदीवरील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या आत्मघाती हल्लेखोराने ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात आले होते.