टी२० विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून ‘अंतिम’ सामना रविवारी न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान रंगणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानी संघाला पराभवाचा झटका देत स्पर्धेतून नॉक आउट केलं आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने साखळी सामन्यांमध्ये एकही सामना न गमावता दिमाखात उपांत्यफेरी गाठली होती. मात्र कांगारूंनी दिलेल्या झटक्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषकाचे स्वप्न यंदातरी भंगले आहे.
पाकिस्तान क्रिकेटचे समर्थक संघाच्या पराभवामुळे धक्क्यात असून समाज माध्यमांवर पाकिस्तान टिमविरोधात रोष व्यक्त करण्यात येतोय. अशातच कालच्या सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज असलेल्या मॅथु वेड याचा झेल सोडणाऱ्या हसन अली याच्यावर विखारी टीका होताना दिसतेय.
शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर मॅथु वेड याने हवेत उडवलेला झेल हसन अलीने सोडला. यानंतर वेडने पाकिस्तानला अक्षरशः वेड लावले. पुढील तिन्ही चेंडूंवर वेडने तीन षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवून दिला.
सामना गमावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी हसन अलीने वेडचा झेल सोडला नसता तर कदाचित निकाल आपल्या बाजूने लागला असता असे तर्कट बांधून अलीवर टीकेची झोड उठवली. तसेच त्याच्यावर समाज माध्यमांवर विखारी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता ट्रोल होत असलेल्या हसन अलीच्या पाठीशी भारतीय चाहते उभा राहिले असून अनेकांनी #INDwithHasanAli असा हॅशटॅग वापरत त्याला समर्थन दिले आहे.
खेळामध्ये अशा चुका होत असतात त्यामुळे हसन अली याच्यावर होत असलेली टीका थांबवावी असा सूर समाज माध्यमांवर दिसतोय.