गुन्हेगारीचा ट्रेंड बदलला; सॅनिटायझर, मास्क, तंबाखू आणि मद्याचा काळा बाजार
पुणे – लॉकडाऊनमध्ये शहरातील गुन्हेगारीचा ट्रेंड बदलला आहे. रस्त्यावर शुकशुकाट असल्याने सोनसाखळी, पाकीट, बसमधील चोऱ्या, रस्त्यात अडवून हल्ला असे प्रकार जवळपास बंदच झाले. मात्र दुसरीकडे नागरिकांची गरज ओळखून तंबाखूजन्य पदार्थांचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
यामध्ये सिगारेट, तंबाखू, गुटखा आदी वस्तूंची बेकायदा आणि दामदुप्पट दराने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तर मध्यंतरी मद्याची दुकाने सुरू झाल्यावर दारू पिताना वाद होऊन हाणामारीच नव्हे तर खुनाच्याही काही घटना घडल्या. सध्या लॉकडाऊनला काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने परगावी अडकलेले नागरिक परतू लागले आहेत. यातील अनेक नागरिकांना त्यांची बंद घरे फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत.
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच गुन्हेगारीच्या प्रवृत्तींनाही घराबाहेर पडणे जवळपास मुश्कीलच झाले होते. यामुळे पुण्यातील 32 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख मोठ्या प्रमाणात प्रथमच खालावला होता. दिवसाकाठी एखाददुसराच गुन्हा दाखल होत होता. तोही वैयक्तिक कारणाचा. रस्त्यावरील वाटमारी बंदच झाली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनाला जातात. मात्र यंदा तेही घरात अडकून पडल्याने घरफोडीच्या घटनांना अटकाव बसला. रस्त्यात गल्लोगल्ली कडक पोलीस बंदोबस्त आणि सोसायट्यांमध्ये जागता पहारा तसेच नागरिकही सावध होते. यामुळे घरफोडीसारख्या गुन्ह्यांनाही आळा बसला होता. मात्र आता रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. सोसायट्यांच्या गेटवरील बंधणेही कमी झाली आणि रस्त्यावरील पोलिसांचा पहाराही कमी झाला. याचा फायदा उठवत काही भामट्यांनी बंद घरे हेरुन घरफोड्या केल्या आहेत. घरफोड्यांचे प्रकार आता हळूहळू पुढे येत आहेत.
दुसरीकडे तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच देशी आणी विदेशी दारूची बेकायदा विक्रीही वाढली होती, तर अनेक जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्यांनीही काळा बाजार केलेला आढळला. चढ्या दराने धान्य विकणाऱ्या अनेकांवर कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांनी सॅनिटायझर आणि मास्कचाही काळा बाजार केला. असा मोठा साठा पुणे पोलिसांनी आजवर जप्त केला आहे.
सायबर गुन्हेगारांची चांदी
सायबर गुन्हेगारांची मात्र लॉकडाऊनमध्ये चांदी झाली आहे. बॅंकांसंदर्भातील तसेच क्रेडिट व डेबिट कार्ड संदर्भातील माहिती घेऊन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक आर्थिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. मोबाइलवर कॉल करून क्रेडिट व डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन अनेकांच्या बॅंक खात्यातील हजारोंच्या रकमा काढून घेण्यात आल्या आहेत.