नवी दिल्ली – गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी आम आदमी पक्षाने (आप) सुरू केली आहे. या निवडणुकीत सत्तारूढ भाजपला घेरण्यासाठी ‘आप’ प्रामुख्याने सरकारी शाळांचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सूचित होत आहे.
शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी नुकतीच गुजरातला भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्या राज्यातील भावनगरमधील सरकारी शाळांची पाहणी केली. गुजरातमधील सरकारी शाळांची स्थिती दयनीय असल्याचे म्हणत त्यांनी भाजपला डिवचले. त्यावरून दिल्ली भाजपने प्रत्युत्तर देताना दिल्लीतील सरकारी शाळांची स्थितीच अत्यंत खराब असल्याचे म्हटले.
त्यानंतर सिसोदिया यांनी थेट गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि शिक्षणमंत्री जितू वाघानी यांना पत्र पाठवून दिल्लीतील सरकारी शाळांची पाहणी करण्याचे निमंत्रण दिले. राजकीय मतभेद दूर ठेवून दिल्लीतील सरकारी शाळांना भेट द्या. त्या भेटीने आपचे प्रशासन मॉडेल तुम्हाला समजेल, असे सिसोदिया यांनी पत्रात म्हटले. आप सरकारच्या कारकिर्दीत दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट झाल्याचे चित्र आहे.