पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर सुरू असलेली महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात येत आहे. संध्याकाळी पाच वाजल्यापासून शहरातील आठही मतदार संघातून जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेला सुरूवात झाली आहे. शनिवारी ही यात्रा पुण्यात येणार असून, संध्याकाळी शेवाळवाडी फाट्याजवळ तिचे स्वागत होईल आणि चंदननगर येथे त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान 56 चौकांमधून ही यात्रा जाणार असून, यातून आठही मतदार संघ कव्हर केले जाणार आहेत. यातील आठ ठिकाणी मुख्यमंत्री नागरिकांना संबोधित करणार आहेत.
पर्वती विधानसभा मतदार संघासाठी स्वारगेट चौकात, कसबा विधानसभा मतदार संघासाठी दुर्वांकूरच्या चौकात, कोथरूड विधानसभा मतदार संघासाठी मेहेंदळे गॅरेज चौक, हडपसर विधानसभा मतदार संघासाठी फातिमानगर, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघासाठी कृषी विद्यापीठ चौक आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघासाठी येरवडा येथे जनयात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत.
तत्पूर्वी सरकारच्या विकासाभिमुख धोरणांबाबत थेट जनतेमध्ये संवाद साधण्यासाठी महसूल तथा पुण्याचे पालकामंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. जनादेश यात्रेच्या आधी ठिकठिकणी हे पथनाट्य आयोजित करण्यात येत आहे. शनिवारी पुण्यातही विविध ठिकाणी ही पथनाट्ये आयोजित करण्यात येणार आहेत.