नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (29 फेब्रुवारी) संध्याकाळी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. या बैठकीनंतर सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १०० उमेदवारांची नावे निश्िचत झाली आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. या बैठकीस नरेंद्र मोदी, अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप नेते बीएल संतोष आणि इतर सदस्य उपस्थित होते. तसेच राज्यांच्या कोअर ग्रुपचे प्रमुख सदस्यही सहभागी झाले.
यामध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, गोवा, उत्तराखंड, गुजरात, आसाम, झारखंड, तामिळनाडू, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार, ओडिशा, दिल्ली, मणिपूर आणि या राज्यांतील जागांसाठी पॅनेलचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीत 100 ते 120 उमेदवारांची नावे असू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह सुमारे 40 नेत्यांची नावे जाहीर केली जाऊ शकतात.