मुंबई : मागील २५ वर्षांहुन अधिक काळ युतीत असणाऱ्या शिवसेनेनं भाजप सोबत काडीमोड घेऊन एका नवीन वाटचालीला सुरवात केली आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी सोबत जाऊन सत्ता स्थापन करणार असल्याची प-परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेनं आघाडीसोबत जाऊ नये या साठी भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
ते म्हणाले की “सत्तास्थापनेची खलबतं सुरु असताना आता आरोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत असंच दिसून येतं आहे. शिवसेनेसोबत आमची आघाडी होऊ नये म्हणून भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे” शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी व्यापक चर्चा केली.
मात्र शिवसेना एनडीएचा घटक होता तोपर्यंत चर्चा करणे शक्य नव्हते. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यावर म्हणजेच अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर चर्चा सुरु झाली. आम्ही आमदारांशी चर्चा करुन त्यासंबंधी सोनिया गांधी यांना कळवलं. सोनिया गांधी यांनी यानंतर आम्हाला दिल्लीत बोलावलं आणि चर्चाही केली” अस त्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केल आहे.
दरम्यान शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी उशीर झाला होता. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे जाऊ असं शरद पवार यांनीही स्पष्ट केलं. शरद पवार यांनी सोनिया गांधींशीही यासंदर्भात चर्चा केली असंही चव्हाण यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने वेळकाढूपणा केला असं म्हणण्यात तथ्य नसल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.