हाँगकाँग : भारताच्या सायना नेहवालचा विजयासाठीचा संघर्ष कायम राहिला आहे. तिला हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेतूनही पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला आहे. आठव्या मानांकित सायनाला चीनच्या कै यान यान ने १३-२१, २०-२२ अशा दोन सेट्समध्ये पराभूत केलं. त्यामुळे सायना नेहवाल हिच आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलेलं आहे.
गेल्या सहा स्पर्धांचा इतिहास पाहता पाच स्पर्धांमध्ये सायना पहिल्याच फेरीतून बाहेर पडली आहे. मागील काही स्पर्धांपासून तिला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. तिने जानेवारीत इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यावर्षी झालेल्या डेन्मार्क ओपन, चीन ओपन आणि कोरिया ओपनमध्येही तिला पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागला होता.
हाँग काँग ओपनमध्येही हा सिलसिला कायम राहिला. सायनाने आपल्या चिनी प्रतिस्पर्ध्याला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा निभाव लागला नाही.