कोलकत्ता – पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेवरून राजकारण तापले आहे. बंगाल भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केला असून, हा खून असल्याचे म्हटले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह झाडाला टांगल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूर्णचंद्र नाग असे मृतदेह सापडलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.
मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णचंद्र नाग सोमवारी सायंकाळी काही कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. घरातील सदस्यांनी जवळच्या गावात शोध घेतला पण पूर्णचंद्र कुठेच सापडले नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. काही वेळानंतर पूर्णचंद्र यांचा मृतदेह घराजवळील झाडाला लटकत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच मल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, पूर्णचंद्रनाग हा रोजंदारी मजूर असून तो लहानमोठे काम करून घर चालवत असे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपचे कार्यकर्ता म्हणून सदस्यत्व घेतले होते, पण ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. कुटुंबीयांनी पुढे सांगितले की, त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही किंवा कसलाही मानसिक त्रासही नव्हता. दरम्यान भाजपकडून टीएमसीवर आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.