राष्ट्रवादीमुळे भाजपचा “व्हीप’ मोडीत!

गोशाळेला जागा देण्याचा आग्रह : प्रश्‍नांच्या सरबत्तीमुळे प्रस्ताव तहकूब

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखली येथील कोंडवाड्याची जागा किती एकर आहे? जागा किती वर्षांकरिता गोशाळेसाठी खासगी संस्थेला दिली जाणार आहे?, महापालिका काय सुविधा देणार आहे? अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांनी केली. प्रशासनाला त्याची सविस्तर उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे विषय मंजूर करण्याचा “व्हीप’ (पक्षादेश) असताना सत्ताधारी भाजपवर तो तहकूब करण्याची नामुष्की ओढावली.

सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. चिखली येथील कोंडवाड्यासाठी आरक्षित असलेली गट क्रमांक 1,655/2, आरक्षण क्रमांक 1/79 ही जागा जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्ट या खासगी संस्थेला गोशाळा चालविण्यासाठी देण्याचा शहर सुधारणा समितीमार्फत आलेला सदस्य पारित प्रस्ताव विषयपत्रिकेवर 5 व्या क्रमांकावर मान्यतेसाठी ठेवला होता. भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये हा विषय मंजूर करण्याचे ठरले होते.

सभागृह नेते एकनाथ पवार यांनी नगरसेवकांना तसा “व्हीप’ देखील बजाविला होता. माजी महापौर मंगला कदम यांनी या विषयावर चर्चेची मागणी केली. त्या म्हणाल्या, चिखली येथील कोंडवाड्याची जागा किती एकर आहे? जागा किती वर्षांकरिता गोशाळेसाठी खासगी संस्थेला दिली जाणार आहे?, किती वर्षांचा करार केला जाणार? महापालिका काही सुविधा देणार आहे? याबाबतची प्रस्तावात कोणतीही माहिती नाही. त्याची सविस्तर माहिती सभागृहाला होणे आवश्‍यक आहे. त्याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी खुलासा केला. ते म्हणाले 2 हेक्‍टर कोंडवड्यासाठी आरक्षित जागा आहे. गोशाळेला जागा देण्याचा प्रस्ताव सदस्य पारित आहे. त्यामुळे सविस्तर माहिती नाही, असे उत्तर दिले. त्याला पुन्हा कदम यांनी आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, 2 हेक्‍टर म्हणजे महापालिका 5 एकर जागा गोशाळेला देणार आहे. महापालिकेने आजपर्यंत कोंडवाडा का बांधला नाही? आयुक्त सदस्य पारित प्रस्ताव मंजूर करणार आहेत का?, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे उत्तर समाधानकारक नाही. खुलासा व्यवस्थित होत नाही. प्रस्ताव अंगलट येण्याची चिन्हे दिसताच हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात यावा, अशी सूचना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली. त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी हा विषय तहकूब केला आहे.

“त्या’ रस्ता बाधितांना “घरकुल’
भोसरी ते दिघी रस्त्यावरील सीएमई भिंतीलगत सर्व्हे क्रमांक 69, 72 व 84 येथील जागेचे रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांना महापालिकेच्या घरकुल योजनेत प्राधान्याने घरकुल वाटप करण्याची उपसूचना महासभेत मंजूर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)