भाजप-शिवसेना हे आरक्षण विरोधातील पक्ष : प्रकाश आंबेडकर

कराड येथे ओबीसी संघटनेचाचा सत्ता संपादन निर्धार मेळावा संपन्न

कराड आरएसएस व बीजेपीने संविधानाच्याही विरोधात लढाई सुरू केली असून आरएसएस, भाजप, शिवसेना आरक्षणाच्या विरोधातील पक्ष आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण संपले पाहिजे, हे मोहन भागवत यांच्या पोटातील विष बाहेर आले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण कमीपणाचे वाटते.

परंतु, आरक्षण उपकार नव्हे तर विकास करण्याचे साधन असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते. संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, संघटक बाळकृष्ण देसाई, महेशकुमार कचरे, भालचंद्र माळी, सचिन करांडे, ऍड. संभाजीराव मोहिते, अनिल सावंत उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशाच्या संविधानाच्या विरोधात भाजप व आरएसएसने लढाई उभी केली आहे. मोहन भागवत यांनीही आरक्षणाविरोधी वक्तव्य केले होते. येत्या पाच वर्षाच्या काळात ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. त्यामुळे लोकांनी आता जागृत होणे गरजेचे असून ज्यांना आरक्षण नको आहे; त्यांनी भाजपाला मतदान करावे व ज्यांना आरक्षण हवे आहे; त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सातारा जिल्ह्याला आण्णा नायकवडी यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. सरकारच्या काळात त्यांनी तो दाखवून दिलेला आहे. नागनाथ अण्णांच्या लढ्याचा आदर्श वंचित बहुजन आघाडीतील लोकांनी घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड महाराज यांनी वंचित दलितांना प्रवाहात सामिल करून घेतले. त्यांना आपल्या सैन्यात स्थान देऊन तलवारीचा मान दिला. मात्र, त्यानंतरच्या पेशवाईने या समाजाला पुन्हा जाती व्यवस्थेकडे आणण्याचे काम केले. सध्या तेच काम आरएसएस व भाजपकडून केले जात आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेली परिस्थिती सध्या विदर्भात निर्माण झाली आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष केले. तसेच सध्या विदर्भाकडे दुर्लक्ष केलं जात आहे फडणवीसांच्या जागी दुसरा कोणी मुख्यमंत्री असता तर तो दोन-तीन दिवस मुक्कामी राहिला असता. मात्र, तसे झाले नाही, अशी खंतही प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी व्यक्‍त केली. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व सचिन माळी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी केले तर आभार बाळकृष्ण देसाई यांनी मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)