नागनाथअण्णांची क्रांतिकारी उडी देशासाठी प्रेरणादायी

वैभव नायकवडी : हुतात्मा शिक्षण, उद्योगसमूहाच्या वतीने अभिवादन

सातारा  –“पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान म्हणजे एक जाज्वल्य इतिहास आहे. याचे जतन करण्याबरोबरच तो आपल्या तरुणाईसमोर मांडणे आपले कर्तव्य आहे. ब्रिटीश सरकारने अण्णांना सातारा जिल्हा कारागृहात ठेवले होते. येथे प्रचंड असा बंदोबस्त असतानाही त्यांनी सातारा जेलच्या 18 फूट उंचीच्या तटावरुन उडी मारुन ब्रिटीश व्यवस्थेला हादरा दिला होता. त्यांची ही क्रांतिकारी उडी भारतासाठी प्रेरणादायी आहे,’ असल्याचे गौरवोद्गार क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीचे निंमत्रक वैभव नायकवडी यांनी काढले.

नागनाथअण्णांनी सातारा जेलच्या तटावरुन जी क्रांतिकारी उडी मारली त्या घटनेस 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा कारागृहाबाहेरील स्मृतीस्तंभास हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. त्यावेळी वैभव नायकवडी बोलत होते. अभिवादन कार्यक्रमासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोक उपस्थित होते. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील जिंदाबाद, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी जिंदाबाद, प्रतिसरकार चळवळीचा विजय असो या घोषणांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला.

नायकवडी म्हणाले, ‘भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सातारा, सांगली जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटीश सत्तेच्या विरोधात स्वत:ला झोकून देत ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार चळवळीचे नाव जरी नुसते ऐकलेतरी ब्रिटीश यंत्रणेला धडकी भरत होती. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत जे-जे सहभागी होते आणि ज्यांनी-ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे आपण काहीतरी देणे लागतो. त्यांच्या आठवणींना उजाळा देवून त्यांनी केलेल्या कार्याची महती तरुणाईला देणे आपले कर्तव्य आहे.

10 सप्टेंबर हा दिवस साताराच्या प्रतिसरकार चळवळीतील मोठा दिवस असून तो प्रसंग सुवर्णाक्षरात लिहावा असाच आहे. अण्णांनी ब्रिटीशांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेत सातारा जेलच्या तटावरुन उडी मारुन प्रतिसरकारचा लढा पुढे कायम ठेवला. या घटनेचा प्रसंग जरी वाचनात आला अथवा कोणाच्या तोंडून ऐकलातरी अंगावर शहारे येतात. अण्णांची क्रांतिकारी उडी तरुणाईला स्फूर्ती आणि प्रेरणा देते. त्याचाच एक भाग म्हणून या क्रांतिकारी उडीचा गौरव दिन हुतात्मा समूह साजरा करतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो.’

शिराळा पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. विजय भोसले, गंगाराम पाटील, तुकाराम पाटील, शिवांतिका सामाजिक संस्थेचे गणेश दुबळे, दलितमित्र दादासाहेब जाधव, हुतात्मा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पाटील, प्राचार्य बी. आर. थोरात, हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष बाबुराव बोरगावकर, अजित वाजे, शंकर जाधव, शंकर नायकवडी तसेच हुतात्मा संकुलाचे पदाधिकारी आणि अण्णांच्या विचारांवर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.