मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घमासान बघायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवाच्या दिवशी सभा घेतली त्यानंतर लगेच ठाण्यात उत्तर सभा घेतली. राज ठाकरे यांच्या या दोन्ही सभेनंतर राज्यात हिंदुत्वाच्या मुद्याने तोंड वर काढले यानंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. दरम्यान राज ठाकरे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे आणखी एक सभा घेण्यार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व शिनसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपण एक सभा घेणार असल्याची घोषणा केली. आता भाजपनेही बुस्टरडोस सभा घेणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून राज्यात भव्य सभा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर देण्यासाठी तसेच शिवसेना आणि महाविकासआघाडीला डोस देण्यासाठी ही सभा असेल अशी माहिती भाजपनेते आशिष शेलार यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची 1 मे रोजी मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा आयोजित करण्यात असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे.
भारतीय जनता पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय विषयांवर भूमिका मांडण्यासाठी भाजपने ही सभा आयोजित केली आहे. फडणवीसांच्या तडाखेबंद भाषणाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे. गेल्या काही दिवसात मेट्रो कारशेड प्रकल्पापासून ते अनेक घोटाळ्यापर्यंत अनेक मुद्यांवर देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत. असेही शेलार यांनी माहिती देताना सांगितले आहे.