राजवर्धन पाटील यांच्या निवडीमुळे इंदापुरातील युवा वर्गात चैतन्य
नीलकंठ मोहिते
इंदापूर – राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असणारे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पुरते घायाळ करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी नव्या दमाची निर्माण केलेली दिसून येत आहे. भाजपची जम्बो कार्यकारिणी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप – राष्ट्रवादीत काट्याची टक्कर होणार अशी चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली आहे.
मागील पाच वर्षांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव व नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील युवकांची फळी मजबूत करण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे युवा वर्ग भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित होताना दिसत आहे.तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी वयात, लोकसंग्रह वाढविण्याची भूमिका, युवा वर्गाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी राजवर्धन पाटलांनी यशस्वी पाऊल उचलले आहे.त्यातच राजवर्धन पाटील यांना भाजप युवा मोर्चा कोर कमिटीच्या प्रमुख पदाची सूत्रे मिळाल्यामुळे युवकांचे संघटन अधिक मजबूत होणार आहे.
तालुक्यामध्ये प्रत्येक गावातील सामान्य कार्यकर्त्यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या कमिट्यांवर जाण्याची संधी निर्माण झाल्यामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यामध्ये कोट्यवधी रकमेचा निधी विकासासाठी आणत आहेत. असंख्य कामे मार्गी लावत आहेत.
असे असताना देखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात जाहीर सभेत तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचे एकमेव कारण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील लोकांच्या थेट संपर्कात राहत आहेत. तर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री यांच्याकडे असणारा राज्याचा व्याप यामुळे, सध्या तालुक्यातील जनसंपर्क विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
इंदापूर अर्बन बॅंकेमध्ये नुकत्याच झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस, युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभल्याने सभागृह तुडुंब भरले होते. राधिका रेसिडेन्सी कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र देण्याच्या समारंभालादेखील दिवसभर गर्दी होती. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरु झाल्यामुळे आगामी काळात या जम्बो कार्यकारिणीतून अधिकचे मताधिक्य मिळवण्यासाठी मोठा फायदा भाजपला होणार आहे.
पाटील पुन्हा राजकीय सारीपटावर चमकतील
विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे सहकारातील तज्ज्ञ हर्षवर्धन पाटील असल्याने इंदापूर तालुक्यावर अधिकचे लक्ष केंद्रित केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांची ताकद वाढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पाठबळ दिले जात आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा राजकीय सारीपटावर चमकतील असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो आहे.