BJP MP Ramesh Bidhuri – नव्या संसद भवनात प्रवेश करून ३ दिवसही उलटले नसताना, भाजप खासदाराने लोकशाहीच्या मंदिराची मानमर्यादा धुळीस मिळवण्याचं काम केलं आहे. लोकसभेमध्ये बोलताना या खासदाराने विरोधी पक्षाच्या खासदाराला शिव्यांची लाखोळी वाहिली आहे. एवढ्यावरच न थांबता या खासदाराने एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावतील असे शब्दही वापरल्याचे लोकसभा कामकाजाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रमेश बिधुरी असं या खासदाराचं नाव आहे. ते दक्षिण दिल्लीच्या तुघलकाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. खासदार म्हणून त्यांची ही दुसरी टर्म आहे. यापूर्वी ते दिल्ली विधानसभेत सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते.
बिधुरी आणि वादविवाद | BJP MP Ramesh Bidhuri
बिधुरी आणि वादविवाद हे नातं नवं नाही. यापूर्वीही अनेकदा बिधुरी यांच्यावर अपमानजनक वक्तव्याचे आरोप झाले आहेत. मात्र २०१४ पासून आतापर्यंत अनेकदा आरोप झाल्यानंतरही बिधुरी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
२०१४ मध्ये शिवसेनेचे खासदार राजन विचारे व काँग्रेस खासदारांमध्ये, विचारे यांनी महाराष्ट्र सदनातील एका मुस्लिम कर्मचाऱ्याला उपवास सुरु असताना जबरदस्ती खायला घातल्याच्या आरोपांवरून वादविवाद सुरु होते. तेव्हा बिधुरी, बाह्या सारत पुढं आले, शिवीगाळ करू लागले असा आरोप काँग्रेस खासदारांनी केला.
बिधुरी यांनी, काँग्रेसच्या मुस्लिम खासदारांना धर्मावरून शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला होता. बिधुरी यांनी हे आरोप फेटाळले मात्र तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सुनावल्यानंतर त्यांनी माफी मागितली.
महिला खासदारांचे आरोप । BJP MP Ramesh Bidhuri
२०१५ मध्ये काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन यांनी रमेश बिधुरी यांच्याविरोधात तत्कालीन अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. बिधुरी यांनी लोकसभेमध्ये आपल्याला उद्देशून अश्लील व अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप खासदार रंजन यांनी केला होता.
“अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकल मातांना लाभ देण्याची मागणी करत असताना, बिधुरी यांनी मला, आधी तुम्ही नवऱ्याला घटस्फोट द्या मग तुम्हाला असा लाभ देता येईल, अशी अभद्र टिपणी केली.” असा आरोप रंजन यांनी केला होता.
बिधुरी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत त्या महिला असल्याचा गैरफायदा घेत असल्याचं म्हंटलं होत.
आम आदमी पक्षाचे कट्टर विरोधक | BJP MP Ramesh Bidhuri
रमेश बिधुरी हे आम आदमी पक्षाचे कट्टर विरोधक मानले जातात. आम आदमी पक्षाच्या योजनांवर त्यांनी अनेकदा परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, त्यांनी AAP चे राघव चड्ढा आणि कॉंग्रेस पक्षाच्या विजेंदर सिंह यांचा पराभव करून दक्षिण दिल्लीची जागा जिंकली. बिधुरी यांना मतदारसंघात 56.58 टक्के मते मिळाली, त्या तुलनेत चड्ढा यांना 26.35 टक्के आणि सिंग यांना 13.56 टक्के मते मिळाली.