जेरुसलेम – इस्रायलचे लष्कर (Israel Army) हे जगातील सर्वात शस्त्रसज्ज लष्कर मानण्यात येते. या लष्करामध्ये नेहमीच नवनवीन शस्त्रांचा आणि अस्त्रांचा समावेश केला जात असतो. आता इस्त्रायलच्या लष्करामध्ये एका अत्याधुनिक रणगाड्याचा समावेश झाला असून बराक टॅंक (Barak tank) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रणगाड्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
युद्धाच्या परिस्थितीमध्ये शत्रुराष्ट्र कोणता विचार करू शकते आणि शत्रू राष्ट्राची रणनीती काय असू शकेल याचा विचार हे रणगाडे आधीच करू शकतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. फिप्थ जनरेशन प्रकारातील हा टॅंक स्वतःहून आसपासच्या परिसराचा आढावा घेतो आणि शत्रू राष्ट्र कधी हल्ला करू शकेल याची माहितीही त्याला मिळू शकते.
इस्रायलच्या संरक्षण खात्याला हा अत्याधुनिक रणगाडा तयार करण्यासाठी तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागला. हा रणगाडा चालवण्यासाठी चार लोकांची गरज भासते. त्यामध्ये एक ड्रायव्हर, एक गनर, एक लोडर आणि एक कमांडर असतो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून या रणगाड्यामध्ये अनेक अत्याधुनिक सेन्सर्स बसवले असल्याने धोक्यांची जाणीव या रणगाड्याला आधीच होते आणि त्याची माहिती स्वयंचलित पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांना मिळते. त्यामुळे इस्त्रायलचे लष्कर नेहमीच प्रतिहल्ला करण्यासाठी तयार राहू शकते. इस्रायलच्या लष्करात सहभागी झालेल्या हा बराक रणगाडा म्हणजे युद्धक्षेत्रात आलेली एक क्रांती मानण्यात येत आहे.