BJP MP Ramesh Bidhuri – लोकशाहीच मंदिर असलेल्या संसदेमध्ये आज एक अनुचित प्रकार पाहायला मिळाला. भाजपचे लोकसभा खासदार रमेश बिधुरी यांनी विरोधी पक्षाच्या खासदाराला अक्षरशः शिव्या दिल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावतील अशीही वक्तव्य केली. बिधुरी यांच्या लोकसभेतील या गैरवर्तनाची देशभरात निंदा सुरु आहे.
याप्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लोकसभेत माफीही मागावी लागली. अशातच आता भाजपने देखील बिधुरी यांच्या लोकसभेतील गैरवर्तनाची दाखल घेत त्यांना १५ दिवसांमध्ये खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, बिधुरी यांच्या असंसदीय भाषेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त असून यापुढे अशी भाषा वापरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बिधुरी यांना देण्यात आल्याचे समजते.
बिधुरी यांची पहिलीच चूक नाही… । BJP MP Ramesh Bidhuri
खासदार बिधुरी यांचे हे पहिलेच द्वेषमूलक वक्तव्य नसून यापूर्वी २०१४ मध्येही लोकसभेत त्यांनी मुस्लिम खासदारांना उद्देशून असं वक्तव्य केलं होत. त्यावेळी त्यांना माफी मागावी लागली होती. २०१५ मध्ये एका काँग्रेस महिला खासदाराने बिधुरी यांच्यावर अश्लील व अपमानजनक टिपणी केल्याचा आरोप केला होता. तेव्हाही बिधुरी यांच्यावर कोणती ठोस कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे लोकसभा अध्यक्ष व भारतीय जनता पक्ष यावेळीही नोटिसांचे कागदी घोडे नाचवणार की बिधुरी यांच्यावर काही ठोस कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये काय? । BJP MP Ramesh Bidhuri
बिधुरी यांनी लोकसभेत शिव्यांची लाखोळी वाहत राजकारणाची खालावलेली पातळी अधोरेखित केली आहे. मात्र देशामध्ये अवघ्या काही महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून निवडणुकांमध्ये मतांच्या बेरजेसाठी नेतेमंडळी ही पातळी आणखी किती खाली पाडतात हे वेळच सांगेल.