-->

भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राष्ट्रवादीत होणार वापसी ? केले ‘हे’ सुचक विधान

शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीत येण्यासाठी यू-टर्न घेतल्याच्या जिल्ह्यात चर्चा

मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आले आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. “शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे. त्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, मात्र गावांचा तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल,” असे विधान भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा घरवापसी होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच शिवेंद्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार असल्याचेही म्हटले जात आहे. मुंबईतील सरपंच परिषद या संघटना व जावळी तालुक्याच्या वतीने सरपंच व करोना योद्धा म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या सरपंचांचा मेढा (ता जावळी) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी हे विधान केले.

दरम्यान, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जावळी येथे शेतकरी मेळाव्यात जाहीर धमकी दिली होती. ‘माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,’ अशा शब्दांत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आव्हान दिले होते. “माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे,” असेही शिवेंद्रसिंहराजे शशिकांत शिंदेंना उद्देशून म्हणाले होते.

जावळी तालुक्यातील राजकारणामुळे शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मध्ये जुगलबंदी होत वाद विकोपाला गेले होते.यानंतर शशिकांत शिंदे यांनी माझ्यामध्ये व शिवेंद्रसिंहराजेमध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही आजही एकत्र काम करत असल्याचे म्हटले होते. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही सर्वांना घेऊन बिनविरोध करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. सध्या शिवेंद्रसिंहराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. सातारा पालिकेची निवडणूक शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटलेले आहे. त्याच दिवशी रात्री जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सातारा विश्रामगृहात खलबते झाली होती.

शिवेंद्रसिंहराजेंनी शिवरूपराजेंसोबत रामराजेंची भेट घेतली होती. यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, दुसऱ्या दिवशी शिवेंद्रसिंहराजेंनी बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मागील निवडणुकीनंतर कोण कुठे गेले आणि कोण कुठे गेले हे सर्वांना माहीत आहे, परंतु आम्ही दोघे आजही एकत्रच काम करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळेच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी शिवेंद्रसिंहराजे यांची घरवापसी होणार अशी अटकळ बांधली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.