पुणेकरांना भाजपची निवडणूक भेट; मिळकत करात ‘इतक्या’ टक्क्यांची सूट

निवासी मिळकतधारकांना मिळणार लाभ

पुणे – प्रशासनाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित केलेली 11 टक्के करवाढ फेटाळून लावत, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांना मिळकतकरात सरसकट 15 टक्के सूट देण्यास गुरूवारी झालेल्या खास सभेत मान्यता देत आगामी महापालिका निवडणुकीची भेट दिली आहे.

या सवलतीचा लाभ मागील आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ज्या निवासी मिळकतधारकांनी कर भरलेला आहे, तसेच जे 1 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत कर भरतील त्यांना दिला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे यावेळी उपस्थित होत्या. महापालिका प्रशासनाकडून 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 11 टक्के करवाढ प्रस्तावित केली होती. या करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यानंतर या विषयासाठी गुरूवारी महापालिकेची खास सभा घेण्यात आली. ही सभा ऑनलाइन झाली. या सभेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत एकमताने प्रशासनाची करवाढ फेटाळून लावली तसेच पुणेकरांनी करोना संकटाच्या काळात राज्यात सर्वाधिक करभरून महापालिकेस आर्थिक संकटात मदत केली. ही बाब लक्षात घेऊन प्रामाणिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आहे. 

यावेळी रासने म्हणाले, “गेल्या आर्थिक वर्षात करोना संकट असतानाही, पुणेकरांनी महापालिकेच्या आवाहानाला प्रतिसाद देत आता पर्यंत जवळपास 1,400 कोटींचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. तर अभय योजनेतही सुमारे 500 कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे पुणेकरांवर करवाढ न करता प्रामाणिक करदात्यांना ही सवलत दिली जाणार आहे. त्यात, मिळकतकरात आकारले जाणारे राज्यशासनाचे कर वगळून इतर जेवढे कर महापालिका वसूल करते त्या सर्व करांवर ही सरसकट 15 टक्के सवलत असणार आहे.

उदा. महापालिका एखाद्या करदात्यास 500 रुपये कर आकारत असेल आणि त्यात 50 रुपये शासनाचा कर असेल तर शासनाचा कर वगळून उर्वरित 450 रुपयांवर मिळकतधारकास ही सवलत दिली जाईल.’ तर “या सवलतीसह, 31 मेपूर्वी कर भरल्यास देण्यात येणारी सर्वसाधारण करातील 10 ते 25 टक्के सवलतही कायम राहणार असून शहरातील सुमारे साडेसहा ते सात लाख मिळकतधारकांना या योजनेचा फायदा होणार आहे,’ असे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.

ही सवलत केवळ निवासी मिळकतधारकांना असून ज्यांनी मागील वर्षात कर भरला आहे, तसेच नवीन आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत कर भरणाऱ्यांनाच ही सवलत असणार आहे. प्रामाणिक करदात्यांसाठी ही योजना असून जास्तीत जास्त पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.