बिल गेट्‌स, प्रियंका चोप्रा, मलाला जयपूर साहित्य सोहळ्याचे आकर्षण

यावर्षी पाच दिवस ऑनलाईन साजरे होणार साहित्य संमेलन

जयपूर – आपल्या 14 व्या वर्षात पदार्पण करत असलेला जयपूरचा आंतरराष्ट्रीय साहित्य सोहळा “जयपूर लिटरेचर फेस्टीवल’ या नावाने ओळखला जात असतो. यावर्षी हा साहित्याचा कुंभमेळा ऑनलाईन स्वरुपातच साजरा होणार असून “मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्‌स आणि “बॉलिवूड ते हॉलिवुड’ असा यशस्वी प्रवास केलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा-जोनास तसेच शांततेचा “नोबेल’ पुरस्कार विजेती पाकिस्तानी युवती मलाला युसुफझाई हे यावर्षीच्या साहित्य सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

प्रतीवर्षी जयपूरच्या डिग्गी पॅलेसमध्ये जानेवारीच्या अखेरच्या सप्ताहात सुरु होणारा हा साहित्य मेळा यावर्षी 19 ते 24 फेब्रुवारी असा ऑनलाईन स्वरुपात साजरा होत आहे. त्यानिमित्त आयोजित व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये महोत्सवाच्या संकल्पक नमिता गोखले आणि संजय रॉय यांच्यासह विल्यम डॅरिलिम्पल यांनी यावर्षीच्या कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. तसेच या वर्षीपासून मॉरिशसमध्येही हा साहित्यसोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या सोहळ्याच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह अन्य देशांतही आवृत्त्या आयोजित केल्या जातात, त्यात आता मॉरिशसची भर पडते आहे.

यावेळी संजय रॉय म्हणाले की, यावर्षीचा साहित्यसोहळा ऑनलाईन होत आहे, ही जमेची बाजू आहेच; शिवाय प्रदीर्घ अशा लॉकडाऊनच्या काळातही आम्ही 280 पेक्षा जास्त युट्युब लाईव्हद्वारे नामांकित लेखकांशी वाचकांचा वार्तालाप घडवून आणला आहे. त्यामुळेही महोत्सवाच्या लोकप्रियतेत भर पडली असून आजवर या सर्व व्हिडीओजना 10 लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक लाभले आहेत.

यावर्षी “अनफिनिश्‍ड’ या आपल्या पहिल्या पुस्तकाने प्रकाशझोतात आलेल्या प्रियंका चोप्राची मुलाखत सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र असेल. तसेच बिल गेट्‌स मायक्रोसॉफ्टची स्थापना आणि वाटचाल याविषयी आपले अनुभव शेअर करतील. त्याशिवाय साहित्यातील “नोबेल’ पुरस्कार विजेते लेखक जोसेफ स्टीग्लिट्‌झ आणि मान बुकर पुरस्कार विजेते लेखक डग्लस स्टुअर्ट तसेच “पुलित्झर’ विजेते जेफ्री जंटलमन यांचा मुख्य समावेश असेल. भारतीय लेखकांमध्ये प्रसून जोशी, ओरून दास, शोभा डे, विद्या शहा यांच्यासह मोनिका शेरगिल, विक्रम चंद्रा, विधु विनोद चोप्रा आणि पुल्लेला गोपीचंद अशा नामांकितांचा सहभाग असेल. संमेलनाचा शुभारंभ सर इयान ब्लॅचफोर्ड यांच्या हस्ते होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.