नवी दिल्ली – आयोध्येतील गोसाईगंज येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार इंद्र प्रताप तिवारी यांना सोमवारी एका विशेष न्यायालयाने महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी फेक मार्कशीट दाखविल्याप्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे हे प्रकरण 28 वर्षांपूर्वीचं आहे.
विशेष न्यायाधीश पूजा सिंह यांनी हा निकाल दिला. त्यानंतर लगेचच न्यायालयात सुनावाणी वेळी हजर असलेल्या तिवारी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी तुरुंगात केली. तसेच त्यांना 8 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
गोसाईगंज मतदार संघातून इंद्र प्रताप तिवारी उर्फ खब्बू तिवारी निवडून आलेले आहेत. तिवारी विरुद्ध 1992 मध्ये आयोध्येतील साकेत डिग्री कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य यदुवंश राम त्रिपाठी यांनी राम जन्मभूमी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.
मिळालेल्या माहिती नुसार तिवारी यांनी दुसऱ्या वर्षात अनुत्तिर्ण झाल्यानंतर फेक मार्कशीट दाखवून पुढच्या वर्गात प्रवेश मिळवला होता.