पुणे – भाजप प्रदेश कार्यसमिती बैठकीमुळे गुरुवारी मध्यवर्ती भागात भीषण वाहतूक कोंडी झाली. पक्षाचे आणि पोलिसांचे पार्किंगसंदर्भात नियोजन नसल्याने जंगली महाराज रस्त्यांवरील गल्ली-बोळ जाम झाली होती. कार्यकर्त्यांनी दिसेल, तिथे वाहने लावून कोंडीत भर घातली होती. याचा मनस्ताप मात्र पुणेकरांना सहन करावा लागला होता.
बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळपासून ही बैठक होती. यासाठी पोलीस बंदोबस्त होता. सकाळपासूनच वाहतूक पोलीस नियोजनात होते. मात्र, कार्यकर्त्यांची आणि व्हीआयपींची संख्या मोठी असल्याने सभागृहाचे पार्किंग फुल झाले होते. यामुळे अनेकांनी आपली वाहने जंगली महाराज रस्त्यासह गल्लयांमध्ये जागा मिळेल तेथे लावली. यामुळे नियमित वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते.
सायंकाळी पाच वाजता आमदारांची बैठक घोले रस्ता येथील सभागृहात होती. तेथे पदपथावर पोलिसांसह आमदारांचीही वाहने पार्क होती. हा रस्ता छोटा असल्याने पोलिसांना नियोजन करताना नाकीनऊ आले. पोलीस कार्यकर्त्यांना विनंती करण्यावर भर देते. वाहतूक पोलीस सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत रस्त्यावर उभे होते. दुपारच्या कडक उन्हातही ते आपले कर्तव्य निभावत होते. मात्र, बेशिस्त वाहनांमुळे झालेली कोंडी सोडवताना त्यांची धावपळ उडाली.