लखनौ –भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला, त्यातही कॉंग्रेसप्रमाणेच विद्यार्थिनींना स्कूटी देण्याचे आश्वासन देण्यात आले असून प्रत्येक घरात किमान एकाला रोजगार देण्याचीही ग्वाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन कोटी टॅबलेट किंवा स्मार्ट मोबाइल फोन दिले जाणार आहेत. पुढील पाच वर्षात उत्तर प्रदेशात तीन कोटी रोजगाराचेही आश्वासन यात आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने तीन कोटी लोकांना रोजगार दिल्याचा दावाही यात आहे.
लोककल्याण पत्र नावाने हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाबरोबरच होळी आणि दिवाळीच्या सणाला दोन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज, जलसिंचनासाठी पाच हजार कोटी रुपयांची स्वतंत्र योजना, 25 हजार कोटी रुपये खर्चाची सरदार वल्लभभाई पटेल कृषी पायाभूत सुविधा योजना आदी योजनांची आश्वासनेही यात देण्यात आली आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आदित्यनाथ आदी ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आज हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले. यात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. प्रामुख्याने गहू आणि तांदळाच्या आधारभूत किमतीत वाढ करणे, उसाचे पेमेंट चौदा दिवसांच्या आत होईल अशी व्यवस्था निर्माण करणे आदी तरतुदींची आश्वासने देण्यात आली आहेत. चौदा दिवसांच्या आत उसाचे पेमेंट झाले नाही तर होणाऱ्या विलंबाबद्दल व्याज वसूल करून ते शेतकऱ्यांना दिले जाईल, असेही भाजपने म्हटले आहे.