राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग : विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार
बारामती – बारामती पोखरून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम सध्या भाजप करत आहे. तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींना भाजपाची भुरळ पडली असून त्यांचा भाजपात प्रवेश करण्याच्या दृष्टीने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वेगवान हालचाली सुरू आहेत. लवकरच या 21 ग्रामपंचायती भाजपाला जोडल्या जाणार आहेत. या ग्रामपंचायतीचे सदस्य भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 14) हे प्रवेश करण्याचे नियोजन होते; मात्र वेळेचे गणित जमत नसल्याने इंदापूर व बारामतीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश इंदापूरच्या कार्यक्रमात करण्याचे नियोजन केल्याचे गावडे यांनी सांगितले. राज्यात भाजपकडे सर्वांचाच ओढा असल्याने बारामती तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींनीही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी लेखी पत्रे दिली असल्याचे बाळासाहेब गावडे म्हणाले. अजूनही अनेक महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येऊ इच्छित असून त्यांना टप्याटप्याने आम्ही सामावून घेणार आहोत. भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच आम्ही आमचे दरवाजे खुले ठेवले असल्याचेही गावडे यांनी सांगितले.
आम्ही निवडणूक सोडलेली नाही…
चंद्रकांत पाटील यांनी जरी बारामतीची निवडणूक जिंकणे हा आशावाद ठरेल असे नमूद केलेले असले तरी आम्ही ही निवडणूक सोडून दिलेली नाही, तुम्हाला काही दिवसानंतर याबाबत काही बाबी समोर आलेल्या दिसतील, असे सूचक वक्तव्य बाळासाहेब गावडे यांनी केले.