शहीदांचा अपमान करणे ही भाजपची संस्कृती : मोहन जोशी

पुणे – “राजीव गांधी हे मिस्टर क्‍लीन असल्याचे सुरुवातीला सांगितले जात राहिले आणि “भ्रष्टाचारी नं. 1′ अशी त्यांची जीवनाची अखेर झाली’ अशी विपर्यस्त आणि जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा कॉंग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो, असे पत्र माजी आमदार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

देशातील जनता आता आपल्याला झिडकवणार आणि सत्ताबदल झाल्यानंतर राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचार उघड होईल, या भीतीने गांगरून गेल्यामुळेच ते अशी बेछूट विधाने करीत आहेत, अशीही टीका जोशी यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारने काय केले हे सांगून पंतप्रधान मोदी आणि भाजपने जनतेला सामोरे जायला हवे होते. मात्र, देशापुढील कोणतेच प्रश्‍न सोडवता न आल्यामुळे वैयक्तिक खालच्या पातळीवरील टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीकाही जोशी यांनी केली.

1984-85 मध्येच देशात संगणक क्रांती करून आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या कर्तबगार पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी बलीदान दिले, देशासाठी ते शहीद झाले. राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामधूनही न्यायालयाने त्यांची मरणोत्तर निर्दोष मुक्तता केली. हा इतिहास माहित असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर अशी टीका करून शहीदांचा अपमानच केला आहे, असेही जोशी यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.