शासकीय टॅंकरद्वारे पिण्यासाठी अशुद्ध पाणीपुरवठा

बाळासाहेब गुंड ग्रामस्थ पिंपळगाव देपा
संगमनेर तालुक्‍यातील पिंपळगाव देपा गावात टॅंकरमधून फेसाळलेले पाणी

संगमनेर – दुष्काळात पाण्यासाठी होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला खरा; मात्र या टॅंकरद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने दुष्काळी जनतेच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर तालुक्‍यातील पिंपळगाव देपा गावाला रविवारी (5 मे) शासकीय टॅंकरद्वारे चक्क फेसाळलेले तसेच पिण्यास योग्य नसलेला पाणी पुरवठा केल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी टॅंकरद्वारे आलेले पाणी पूर्णत: फेसाळलेले होते. या दूषित पाण्याचे नागरिकांनी व्हिडीओ काढून पुरावा म्हणून पंचायत समितीच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. किमान यापुढे तरी शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरासरी 416 मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या संगमनेर तालुक्‍यात यंदा निम्माच पाऊस झाल्याने भीषण पाणी टंचाई आहे. सध्या 41 गावे आणि 250 वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरद्वारे सुमारे 1 लाख 13 हजार लोकसंख्येसाठी 7 सरकारी आणि 49 खासगी अशा एकूण 56 टॅंकरद्वारे रोज 153 खेपांच्या माध्यमातून हा पाणीपुरवठा केला जात आहे.संगमनेर खुर्द, रायतेवाडी, कौठे बु, गंगामाई घाट, नगरपालिका या ठिकाणी पाणी स्रोत पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असून, सर्वाधिक पाणी प्रवरा नदी काठच्या रायतेवाडी आणि संगमनेर खुर्द ग्रामपंचायत विहिरीवरून दुष्काळी गावांना पुरविले जाते.

काल संध्याकाळी रायतेवाडी ग्रामपंचायत विहिरीवरून पिंपळगाव देपाच्या गोकुळवाडी आणि सुतारवस्तीच्या 200 लोकसंख्येसाठी शासकीय टॅंकरद्वारे चक्क फेसाळलेले तसेच पिण्यास योग्य नसलेला पाणीपुरवठा करण्यात आला. या दुषित पाण्याचे नागरिकांनी चित्रीकरण केले. शासकीय टॅंकरकडून नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञच आहे.

यंदा दुष्काळी परस्थितीमुळे वर्षभर टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. काल अकराव्या दिवशी टॅंकरद्वारे देण्यात आलेल्या पाण्याचा फेस तयार झाला. आता पाणी प्यायला नाही करायचं काय?

भीमबाई गुंड ग्रामस्थ, पिंपळगाव देपा

टॅंकरद्वारे रोज 153 खेपा दैनंदिन पाणी पुरवठा केला जात आहे. पिंपळगाव देपा येथे काल पूर्णत: फेसाळलेला पाणी पुरवठा झाल्याचे समोर आले. अन्य ठिकाणी असे आजपर्यंत घडले नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी चुकीचा पाणीपुरवठा होत असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.

सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी, संगमनेर

आम्हाला आठव्या दिवशी टॅंकर येणे गरजेचे असताना, अकराव्या दिवशी टॅंकर आला. काल टॅंकरद्वारे देण्यात आलेल्या पाण्याचा टाकीच्या बाहेर जाईल इतका फेस तयार झाला होता.

बाळासाहेब गुंड ग्रामस्थ पिंपळगाव देपा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.