पिंपरी-चिंचवड : जलतरण तलाव, बांधकामांना पाणी पुरवठ्यास विरोध

भाजप नगरसेवक प्रा. केंदळे यांचे महापालिका आयुक्‍तांना पत्र

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे महापालिकेने दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली आहे परंतु, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने शहरातील जलतरण तलाव, बांधकामे आणि वॉशिंग सेंटर यांना पुरविला जाणारा पाणी पुरवठा बंद करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक प्रा. केंदळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे शहरात 6 मे पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पवना धरणात 29 टक्के साठा राहीला आहे. पावसाळा लांबणीवर पडणार आहे याचा अंदाज घेऊन ही पाणी कपात करण्यात येत आहे. त्यातून 25 टक्के पाणी बचत होऊन धरणातील पाणी साठा 15 जूलैपर्यंत पुरेल. परंतु, पाऊस लांबणीवर जाण्याची शक्‍यता वर्तविली गेलेली आहे. पुढील दोन महिने पाणी टंचाईच्या दृष्टीने कठीण आहेत.

शहरातील मोठमोठ्या बांधकामाला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा सुरू आहे. बिल्डर्सच्या मोठमोठ्या साईट शहराच्या विविध भागात सुरू आहेत. बहुतेक साईटला महापालिकेचाच पाणी पुरवठा असल्याचे निदर्शनास आलेले आहे. टॅंकरद्वारेही पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे रोज लाखो लीटर पाणी बांधकामावर खर्च होते. त्याचा विचार करता शहरातील जलतरण तलाव व बांधकामांसाठी दिले जाणारे पाणी बंद करावे. तसेच, शहरात वॉशिंग सेंटर्सची संख्या मोठी आहे. वॉशिंग सेंटर्सच्या माध्यमातून रोज हजारो लिटर पाणी वापरले जाते. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता वॉशिंग सेंटर्सचे पाणी बंद करणे गरजेचे आहे. तसेच, महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रृटीमुळेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तेही नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपापयोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

जलतरण तलावांना पिण्याचे पाणी…?

टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने नेहरूनगर, भोसरी, थेरगाव, केशवनगर, मोहननगर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, यमुनानगर, संभाजीनगर, पिंपरी गाव, प्राधिकरण-निगडी असे तेरा जलतरण तलाव सुरू आहेत. सर्वच तलावांवरील बोअरिंग बंद असल्याने पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले असल्याचे नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी म्हटले आहे. उन्हाळी सुट्ट्यामुळे मुले, तरूण व नागरिक त्याचा लाभ घेतात. तेथील टॅक, शॉवर, नळ व स्वच्छतागृहातही पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी या तरण तलावांमध्ये खर्ची पडत असल्याकडे केंदळे यांनी लक्ष वेधले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.