साक्षीत पीडित फितुर झाली असताना परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने सुनावली शिक्षा
पुणे : बलात्कार प्रकरणात पीडित अल्पवयीन पुतणी फितुर झाली असतानाही परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने काकाला (चुलत्याला) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे यांनी हा आदेश दिला.
पुतणीला घरात नेवून त्याने हे कृत्य केले होते. दरम्यान आरोपीला दहा हजार रुपये दंड सुनावण्यात आला असून, हा दंड पीडितेला नुकसान भरपाई म्हणुन देण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. 25 वर्षीय काकाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी 5 वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 13 ऑगस्ट 2013 रोजी मुगाव ता. पौड येथे घडली. पीडित मुलगी आपल्या आई-वडील आणि दोन भावासोबत मुगाव येथे राहत होती.
तिचे आई-वडिल मजुरीचे काम करत होते. घटनेच्या दिवशी आईने तिला त्याच गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे सोडले होते. ती कामाला गेली होती. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे आईला दिसले. तेव्हा ती भेदरलेल्या अवस्थेत होती.
त्यावेळी तिच्याकडे विचारपुरस केली असता दुपारी तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपीवर बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ऍड. सुनील हांडे आणि ऍड. जावेद खान यांनी यांनी काम पाहिले.
त्यांनी 10 साक्षीदार तपासले. साक्षीदरम्यान पीडित मुलगी फितुर झाली होती. न्यायालयाने परिस्थिती जन्य पुरावा, मुलीच्या अंगावरील, कपड्यावरील रक्त आरोपीच्या अंगावरील रक्ताबाबात योग्य खुलासा करता आला नाही. त्याच बरोबर आजीने आरोपीला पीडितेला घेऊन जाताना पाहिले होते.
या पुराव्याचा आधार घेत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. घरातल्या माणसानेच हे कृत्य केले आहे. त्या मुलीने कोणावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. सुनील हांडे यांनी केली.