प्रेयसीच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न प्रकरणात 10 वर्षे सक्तमजुरी
दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सुनावली शिक्षा
पुणे – प्रेयसीचा खून करणाऱ्या आणि तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात जन्मठेप आणि 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एच.आर.वाघमारे यांनी सुनावली. दोन्ही प्रकरणात मिळून 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
कैलास किसन शेडगे (वय 56, रा. शेडगेवाडी, ता. मुळशी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. तो चालक आहे. त्याने सुनीता शांताराम बनसोडे हिचा दगडाने ठेचून खून केला. तर तिचा मुलगा विनायक याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून वाहत्या पाण्यात फेकून दिले होते. सरकारी पक्षातर्फे दोन्ही प्रकरणात सहायक जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी खून प्रकरणात 16, तर, खूनाचा प्रयत्न प्रकरणात 13 साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नाईक व्ही.पी.चौधरी, पोलीस हवालदार एस.एच. मोरे यांनी मदत केली.
सुनीता हिचे शांतारम बनसोडे यांच्याशी 1996 मध्ये लग्न झाले होते. दोघात सतत भांडण होत असत. या कारणावरून शांताराम यांचा तिचे वडील आणि भाऊ यांनी खून केला. त्यानंतर सुनीता अशोक घोष नावाच्या व्यक्तीसोबत राहू लागली. त्यांच्यापासून तिला विनायक नावाचा मुलगा झाला आहे. अशोक यांनी तिला सोडून दिले. त्यानंतर ती विशाल जामुनकर नावाच्या सीडी विक्रेत्यासोबत 3 ते 4 वर्षे राहिली. 2010 मध्ये तिचे कैलाससोबत प्रेमसंबंध जुळले. ते दोघे एकत्र राहु लागले. त्यानंतरही ती विशालच्या संपर्कात होती.
विशालने तिला मुंबईत राहण्याबाबत आग्रह धरला. मात्र, कैलास याने तिला विशालसोबतचे संपूर्ण संबंध तोडण्यास सांगितले होते. त्यातून वाद होते. तो तिला 16 फेब्रुवारी 2011 रोजी पुण्यात घेऊन आला. दोन दिवस पुण्यात लॉजवर राहिल्यानंतर मुळशी, मुठा घाट येथील निर्जनस्थळी नेवून दगडाने ठेचून तिचा खून केला. विनायकला घेऊन पुन्हा लॉजवर आला. त्यानंतर 7 मार्च रोजी विनायकला गळा दाबून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले.
या प्रकरणी पौड पोलिसात दोन गुन्हे दाखल झाले होते. प्रत्यक्षदर्शी विनायक, लॉज मालक, डॉक्टर आणि तपासी अधिकारी पौडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांची साक्ष आणि न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा आणि हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. ही दोन्ही प्रकरणे गंभीर स्वरूपाची असून, अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. प्रमोद बोंबटकर यांनी केला