पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात यंदा मुले जन्माला येण्याच्या संख्येत खूप मोठी घट दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल 37 टक्क्यांची घट दिसून येत आहे. तसेच एकीकडे देशात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक झाला असला तरी शहरात अजूनही मुलींचा जन्म दर मुलांच्या तुलनेत कमीच आहे.
सन 2016 पासून ते सन 2020 पर्यंतचे जन्माचे आकडे पाहिल्यास शहरात दरवर्षी सरासरी 27 हजार 500 हून अधिक मुले-मुली जन्म घेतात. यानुसार दर महिन्याला सुमारे 2200 ते 2300 बाळांचा जन्म होतो. परंतु 2021च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरात केवळ 15 हजार 948 मुला-मुलींच्या जन्माची नोंद झाली आहे.
सरासरीच्या तुलनेत हा आकडा सुमारे 37 टक्क्यांनी कमी आहे. कोविड काळात अनेक जणांनी आपल्या मूळगावी स्थलांतर केले. तसेच मार्च 2020 नंतरचा कडक लॉकडाऊनचा काळ व त्यांनंतरचे निर्बंध यामुळे गेल्यावर्षी विवाहही खूप कमी झाले. यामुळे जन्माचे प्रमाण घटल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
एकीकडे देशात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्म दरात वाढ झालेली दिसत आहे. परंतु शहरात अजूनही मुलींच्या जन्म दरात अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. सन 2016 मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 930 होते. परंतु 2017 मध्ये या प्रमाणात घट होऊन ते 917 एवढे कमी झाले तर तर 2018 मध्ये त्यात मोठी घट होऊन 885 एवढे झाले होते.
परंतु 2019 मध्ये पुन्हा त्यात सुधारणा होऊन ते 907 एवढे वाढले. तर 2020 मध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन 930 पर्यंत गेले. तर नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत 919 एवढे प्रमाण आहे.
=====================