रंगीत तालीम समजून प्रचार झाल्याने मोठे मताधिक्‍य

वाईमध्ये राष्ट्रवादीचेच प्राबल्य सिद्ध,
युतीनेही टक्कर दिल्यामुळे विधानसभेची चर्चा सुरू

वाई
धनंजय घोडके
वाई – विधानसभेची रंगीत तालीम समजूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मकरंद पाटील व कार्यकर्त्यांनी प्रचारकाळात घेतलेल्या मेहनतीमुळेच वाई विधानसभा मतदारसंघात विजयी उमेदवार उदयनराजे भोसले यांना चांगले मताधिक्‍य मिळवून देण्यात पक्षाला यश मिळाले. या निकालानंतर विधानसभा निवडणुकीतील समीकरणे कशी होणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

वाई विधानसभा मतदारसंघात आमदार, जिल्हा परिषद, तीन पंचायत समिती, वाई बाजार समिती, वाई नगरपालिका, खंडाळा व लोणंद नगरपंचायती असे राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड मजबूत आह. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडाळीमुळे काही ठिकाणी पक्षाला किंमत मोजावी लागली. बंडोबांनी कितीही उचल खाण्याचा प्रयत्न केला तरीही शेवटच्या क्षणी बाजी पलटण्याची किमया फक्त आमदार मकरंद पाटील यांच्यातच आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने विधानसभेची रंगीत तालीम समजून प्रचार केल्याने उदयनराजे भोसले यांना वाई मतदारसंघात मताधिक्‍य देण्यात आमदार मकरंद पाटील यशस्वी झालेत.

कॉंग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्ते व काही टक्के मतदारांचाही फायदा भोसले यांना झाला. मोदींचा करिष्मा सातारा मतदारसंघात नरेंद्र पाटील यांना निवडून आणण्यात यशस्वी झाला नाही. नरेंद्र पाटील यांनी चांगली लढत दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांना पक्षात घेऊन मताधिक्‍य वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत काही अंशी यश मिळाले. परंतु आमदार पाटील यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावल्यानेच उदयनराजेंना मताधिक्‍य मिळाले.

महायुतीला यश मिळाले नसले तरीही त्यांच्या मताचा टक्का वाढला आहे. यापुढे शिवसेना, भाजप, आरपीआय, व मित्र पक्षांची मोट बांधण्यात यश मिळाल्यास विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रावाडीला कडवे आव्हान मिळू शकते. महायुतीत आरपीआयने तर आघाडीत कॉंग्रेसने प्रचाराचा सवता सुभा मांडला होता. तसेच वंचित आघाडी फॅक्‍टरही परिणामकारकरित्या चालला नाही. त्यामुळे त्याचाही फायदा मताधिक्‍य वाडण्यात झाला.

उदयनराजे पुन्हा एकदा यशस्वी झाल्याने विरोधकांची बोलती यानिमित्ताने बंद झाली आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांची मते मिळवण्यात महायुतीला यश आले नाही. महायुतीच्या उमेदवारांना विधानसभेला आणखी तयारी करावी लागणार आहे, तरच काटे की-टक्कर पाहायला मिळेल. वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य निकालावरून सिद्ध झाले आहे.

विधानसभा मैदानाकडे आता लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. युतीचीही अपेक्षा वाढली आहे. वाई तालुक्‍यात भाजपअंतर्गत बंडाळी कुठेतरी पक्षाला घातक ठरत आहे, मदन भोसले यांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला असता तर आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आह. वाई विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपला सोडल्यास राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील विरुद्ध भाजपचे मदन भोसले अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता पुढील हालचालींकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here