ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर शिक्‍कामोर्तब?

व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी : आकडेवारीही जुळली


वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्‍नांना पूर्णविराम

– गणेश आंग्रे

पुणे – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवरील मतमोजणीनंतर व्हीव्हीपॅट मशीनमधील (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) चिठ्ठ्यांची मतमोजणी करण्यात आली. एका लोकसभा मतदारसंघात एकूण 30 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या.यामध्ये ईव्हीएमची मते आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी केली असता, दोन्ही मशीनवर उमेदवारांना मिळालेली मते तंतोतंत जुळल्याचे दिसून आले. त्यामुळे ईव्हीएमविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्‍नांना पूर्णविराम मिळाला असून ईव्हीएममधील पारदर्शकतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.23) मतमोजणी पार पडली. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर सर्वांचे लक्ष व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीकडे लागले होते. यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट ही यंत्रणा वापरण्यात आल्याने उत्सुकता होती. मागील लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. राजकीय पक्षांकडून याविषयी विविध आरोप करण्यात आले होते. “मशीनमध्ये सेटिंग केलेली आहे, त्यामुळे हा उमेदवार विजय झाला.’ “कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले तरी ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते,’ असे अनेक आरोप करण्यात आले. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या. तर, काही जणांनी याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या पार्श्‍वभूमीवर मतदाराने कोणाला मतदान केले, याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी ईव्हीएमवर दिलेले मत प्रिंट स्वरुपात दिसण्याची व्यवस्था व्हीव्हीपॅट मशीनवर केली. यामुळे मतदाराच्या आणि उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहणार नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला.

त्यानुसारच सर्वच ठिकाणी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) ही प्रणाली वापरली. त्यानुसार ईव्हीएमच्या बाजूलाच व्हीव्हीपॅट जोडण्यात आले. ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत 7 सेंकद दिसले. यामुळे आपले मत प्रत्यक्ष त्याच उमेदवाराला मिळाल्याची खात्री मतदाराला पटली.

कोणत्याही पक्षाकडून आक्षेप नाही
निवडणुकीसाठी आयोगाने लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी करून ती ईव्हीएममधील मतांशी पडताळून पाहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या चिठ्ठ्या काढून व्हीव्हीपॅट मशीनची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निरीक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांसमोर ही प्रकिया पार पाडण्यात आली. व्हीव्हीपॅटच्या मतमोजणी केली असता, ईव्हीएममध्ये मिळालेली मते एकसारखी असल्याचे दिसून आले. यावर कोणत्याही पक्षाकडून आक्षेप नोंदविण्यात आले नाही. त्यानंतर व्हीव्हीपॅट मतमोजणीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीनंतर अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)