कलंदर : पुनरागमन…

-उत्तम पिंगळे

विसरभोळे : या… या… आज सकाळीच येणं केलं?
मी : मग, नवीन सरकार स्थानापन्न होणार म्हणून म्हणालो एकूणच निवडणुकांवर आपले काय म्हणणे आहे?

विसरभोळे : पहिला हा लाडू घ्या.
मी : एनडीएचे सरकार स्थानापन्न होणार म्हणून लाडू तुमच्याकडून अपेक्षित नव्हता?

विसरभोळे : हे लाडू माझ्या क्‍लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी मागवले होते. मला कोणत्याही पक्षाशी देणे घेणे नाही; पण एक स्थिर व मजबूत सरकार येत आहे म्हणूनच हे लाडू मागवले होते. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे देशात भक्‍कम सरकार असेल तर दीर्घ मुदतीचे तसेच जिथे आवश्‍यक असेल तेथे थोड्या काळासाठी कठीण निर्णयही घेतले जाणे आवश्‍यक असते. असे निर्णय केवळ भक्‍कम सरकार घेऊ शकते. डॉ. कलामांच्या स्वप्नातील सुपर भारत बनवायचा असेल तर निर्णयक्षम व कणखर सरकार असणे आवश्‍यक आहे. दूरगामी निर्णय घेण्यासाठी भक्‍कम सरकारच आवश्‍यक असते. म्हणजे आज कॉंग्रेसनेही एकहाती सत्ता आणली असती तरीही मी हेच म्हणालो असतो.
मी : पण विरोधी पक्ष एकदम सपाट झाला आहे त्याचे काय?

विसरभोळे : मुळात या निवडणुकीत प्रचार पातळी अगदी रसातळाला गेली होती. विरोधकांच्या महागठबंधनाचे बीज कर्नाटकातील निवडणुकीत रोवले गेले होते. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान येथील कॉंग्रेसच्या विजयामुळे विरोधकांना एकीचे वेड लागले. पण हे करत असताना त्यांनी आपापसात तडजोड केली नाही. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाने काही ठिकाणी पडते घेऊन एनडीए कायम एकसंध ठेवला. तेलुगूदेशम सारखा महत्त्वाचा पार्टनर बाहेर पडला तरीही आहे त्या पक्षांची मोट सत्ताधाऱ्यांनी नीट बांधून ठेवली. सत्ताधारी गट संयमाने निवडणुकी समोर गेला.
त्यात विरोधकांनी प्रधानमंत्र्यांचे “चौकीदार’ असे नामकरण केले. एवढेच नाही तर “चौकीदार चोर है’ हे सतत भासवून दिले. प्रधानमंत्री हा पूर्ण देशाचा असतो. केवळ “मोदी हटाव हाच नारा’ दिला गेला. लोकांनीही केवळ सत्तेसाठी संधिसाधू गठबंधन आहे हे जाणले त्यामुळेच ते गप्प होते.
मी : त्यातच ईव्हीएमवरून गोंधळ सुरू केला होता?

विसरभोळे : तसं नव्हे केवळ ईव्हीएम नाही तर सीबीआय, निवडणूक आयोग अगदी सर्वोच्च न्यायालयाबाबतही विरोधक शंका घेऊ लागले. निवडणुकीत काही गडबड गोंधळ होणार असा विरोधक खोटा प्रचार करत होते. आज अंतरिक्ष विश्‍वात आपण विज्ञानाच्या जोरावर भरारी घेत असतानाच विरोधक जुन्या मतपेटीकडे जाण्याचा आग्रह करीत होते. लोकांच्या मनात उगाच शंका निर्माण करत होते. एक्‍झिट पोल घोषित झाल्यावर तर विरोधकांनी थयथयाट केला. पुन्हा ईव्हीएमकडे लक्ष वेधून घेतले. प्रथम 50 टक्‍के मोजणीची मागणी केली. ती फेटाळण्यात आली मग आधी व्हीव्हीपॅटची मोजणी करा, असा घोष केला.एकविसाव्या शतकात डिजिटल इंडियाकडे जात असताना डळमळीत गठबंधन पुन्हा कालचक्र मागे फिरवत आहे असे जनमानसात वाटू लागले. जगभर आपल्या पंतप्रधानांना गौरवले जात असताना आपलेच लोक त्यांना थेट “चोर’ संबोधित आहेत हे मनाला पटले नाही आणि त्याचाच हा निकाल म्हणजे परिपाक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.