नगर – तालुक्यात अवैध वाळूचोरी व वाहतुकीविरुद्ध नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून सात ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू असा एकूण 42 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 13 आरोपींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना गणेश भिंगारदे, पोकॉ रणजित जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे व किशोर शिरसाठ अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमून अवैध वाळूचोरी व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पथकाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून अवैधरीत्या वाळूचोरी व वाहतूक करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून एकूण 42 लाख 20 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करून 13 वाळूतस्करांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी करण बाळासाहेब बर्डे (वय 20, रा. शहाजापूर, ता. कोपरगाव), दत्तू कोळपे (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव (फरार), दिलीप विलास पवार (25, रा. कोळगाव थडी, ता. कोपरगाव), देवराम वाल्मीक कोळपे (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव (फरार), किरण साहेबराव निकाळे (25, रा. कोळगाव थडी, ता. कोपरगाव), रामा कुंदलके (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव (फरार), कृष्णा दीपक मोरे (20, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव), आकाश मदने (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव (फरार), अनिल नाथू कचारे (28, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव), मिलिंद खर्डे (रा. माहेगाव, ता. कोपरगाव (फरार), अक्षय किशोर मोरे (19, रा. कुंभारी, ता. कोपरगाव), गणेश डांगे (रा. माहेगाव, ता. कोपरगाव (फरार), योगेश संजय कोळपे (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव (फरार) अशा एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित सात आरोपी फरार आहेत.
दरम्यान, काही वाळूतस्कर राजरोसपणे दिवसाढवळ्या वाळू तस्करी करीत प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणत होते. त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जी वाळू चोरी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरच्या पथकाला दिसली, ती वाळूचोरी कोपरगाव महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला का दिसली नाही हादेखील मोठा प्रश्न आहे.
महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच वाळूचोरी !
वाळूचोरीला आळा बसावा यासाठी महसूल विभागातर्फे नवीन वाळू धोरण अंमलात आणले जात असून, नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध होत आहे. मात्र, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात वाळूचोरी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.