नगर – नगर अर्बन बँकेतील तीन कोटींच्या अपहार प्रकरणी अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी चार जणांना अटक केली. त्या बँकेचे तीन अधिकारी व एक सेवानिवृत्त शाखा अधिकार्याचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन महिन्यानंतर चार आरोपींना अटक केली.
मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्च्युत बल्लाळ, शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, मुख्या शाखेचा कॅशियर राजेंद्र विलास हुंडेकरी, कनिष्ठ अधिकारी स्वप्नील पोपटलाल बोरा (सर्व रा. नगर) असे आरोपींची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्बन बँकेतील तीन कोटींच्या अपहार प्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्च्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या पैशांचा अपहार 7 ऑक्टोबर 2017 ते 10 नोव्हेंबर 2017 या दरम्यान झाला आहे.
याप्रकरणी बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली होती. त्याच दरम्यान अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेमध्ये 22 कोटींचा अपहार झाल्याप्रकरणी तत्कालीन संचालक व इतर तिघे असे चार जणांना अटक केली होती. त्यानंतर नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही तीन कोटींच्या अपहारप्रकरणी तपास सुरू केला.
गेल्या दोन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बँकेच्या मुख्य शाखेमध्ये तपास करत होते. त्यातील काही कागदपत्रे मिळविल्यानंतर त्यावरून चौकशी करून तत्कालीन अधिकारी, सध्याचे अधिकारी यांना आर्थिक गुन्हे शाखेत शुक्रवारी चौकशीसाठी बोलवून सायंकाळच्या वेळी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करीत आहेत.
नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यात आज चार जणांना अटक केली आहे. त्यात आणखी आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
– प्रांजल सोनवणे (पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)