नगर – नेवासा शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका एटीएममधून चक्क पाचशे रुपयांचा दोन नोटा बनावट आल्यामुळे शहरासह तालुक्यातील बॅंक खातेदारांमध्ये खळबळ उडाली. एटीएममधूनही बनावट नोटा कशा आल्या, याबाबत तर्कवितर्कांना मोठे उधाण आलेले असून याबाबत बॅंकेकडून सविस्तर उलगडा होण्याची मागणी खातेदारांतून केली जात आहे.
नेवासा शहरात गुरुवारी आषाढी एकादशीमुळे मोठी गर्दी झालेली होती. राहुरी तालुक्यातील तिळापूर येथील अभय सुदाम मुंढे हा तरुण घरच्यांसोबत कामानिमित्त नेवासा येथे आलेला होता. त्यांनी नेवासा बसस्थानक परिसरातील एका एटीएममधून तीन हजार रुपये रक्कम काढली.
यामध्ये पाचशे रुपयांच्या दोन नोटा नकली आलेल्या होत्या. मुंडे गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर गेले असता पेट्रोल पंपावरील कामगराने या नोटा बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे मुंडे यांनी बॅंकेच्या तक्रार निवारण नंबरवर संपर्क साधला.
बॅंकेला सुट्टी असल्या कारणाने संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी जवळच असलेल्या नागरिकांना ही बाब सांगितली. अनेकांचा विश्वास बसत नसल्यामुळे एटीएममध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात एटीएममधून आलेल्या बनावट नोटा दाखवल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी याबाबत चौकशी करण्याचा आग्रह धरला.
तक्रार निवारण नंबरवर फोन केला असता मुंडे यांना कोणत्याही बॅंकेत जाऊन नोटा बदलवून घ्या, असे सांगितले गेले. मात्र, गुरुवारी आषाढी एकादशी व बकरी ईद असल्यामुळे सर्वच बॅंकांना सुट्टी होती. ज्या बॅंकेचे एटीएम आहे, त्या बॅंकेची शाखा नेवासा शहरात नव्हती. त्यामुळे मुंडे यांना चांगलाच मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.