राजेंद्र वाघमारे
नगर- राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी नवीन वाळू धोरण अंमलात आणल्याचा फायदा नेवासा तालुक्यातील जनतेला होत नाही. जनतेला वाळू सरकारी भावात मिळत नसल्यामुळे नेवाशात अवैध चोरटी वाहतूक खुलेआम सुरू आहे.वाळूतस्करीला लगाम घालणाऱ्या खुपटी येथील नागरिकांनी वाळू चोरी रोखण्यासाठी रस्त्यावर खुपटी येथे जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदूनही तस्कर रातोरात रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजवत आहे. रस्ता खोदणाऱ्या नागरिकांना दमबाजी होत असताना नेवासा तहसिलदार कारवाई न करता मूग गिळून गप्प का? असा संतप्त सवाल उपस्थित करत याविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा खुपटी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
नेवासा तालुक्यातील जनतेने वाळू उचलेगिरीला तीव्र विरोध केल्यामुळे महसूलमंत्री विखे पाटील यांनी सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता. मात्र, नेवाशात एक प्रतिष्ठित इसमच वाळूची सेंटिग लावत असून तो इतरांना कायद्याचे ज्ञान शिकवून हा काळा धंदा करत असेल तर या व्यक्तीला नेमका कोणाचा राजाश्रय लाभला ? या व्यक्तीची मागील दोन महिन्यांपूर्वी ऑडिओ क्लिपही समाजमाध्यमात प्रसारित झाली. हा व्यक्ती कायद्याचे डोस पाजून सरकारी यंत्रणेला हतबल करत असल्यामुळे वाळूतस्करी जोमात सुरू असल्याचा आरोप खुपटी ग्रामस्थांनी केला आहे.
खुपटीचे तलाठी गणेश घुमरे व कोतवाल बाळासाहेब चौधरी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जुना चिंचबण-पुनतगाव रस्त्यावर नदीच्या शेजारी मोठे खड्डे घेऊन रस्ता बंद केला. आज सकाळी वरील शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने 2 डंपर वाळूचे चिंचबनहून येताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महसूल कर्मचाऱ्यांनी तातडीने जर लक्ष घातले तर वाळू चोरी निश्चितच बंद होऊ शकते