नगर – दुध भेसळ रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीच्या पहिल्याच बैठकीत दुध भेसळ करणाऱ्यांसह ते भेसळीचे पदार्थ स्वीकारणाऱ्यांना सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील दुध दर व दुध भेसळ याबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांकडे आता शासनाने लक्ष देण्यास सुरवात केली असून त्या संदर्भात पशुसंवर्धन व दृुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक झाली.
या बैठकीला दुध उत्पादक, सहकारी व खासगी दुध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुधात होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात ही समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर यांनी दिली.
या समितीची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कुटे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर उपस्थित होते. समितीने धडक तपासणी मोहिम दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांना संस्था व आस्थापना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच दुध भोसळ करणाऱ्यांसह ते स्वीकारणाऱ्यांना सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यावेळी सुहास मापारी यांनी सद्यस्थितीत दुध भेसळीबाबत माहिती घेण्यात आली. सध्या दुध केंद्रावर दाखल होणाऱ्या दुध संकलनाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होत नाही. ती माहिती गावनिहाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश मापारी यांनी दिले आहेत.