कॅफ्रीन: सेनेगल देशातून मोठी बातमी समोर येत आहे. दोन बसेसची समोरसमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला असून या अपघातात तब्बल ४० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनेगलमधील कॅफ्रीन भागातील ग्निवी गावात राष्ट्रीय मार्ग क्रमाक १ वर घडला आहे. यातील एका सार्वजनिक बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी पहिली बस समोर येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली.
या भीषण अपघाताचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर येथील राष्ट्राध्यक्ष मॅकी शाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
तसेच या घटनेचा तपास केला जाणार असून आगामी काळात अशा घटना घडू नयेत म्हणून रस्त्यावरील सुरक्षेसाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती मॅकी शाल यांनी दिली.