चिंबळी – मोशी (ता. हवेली) येथील मुदत संपल्यानंतर बंद झालेला टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून सुरू आहेत. दि. 5 जानेवारी 2023 पासून हा टोलनाका सुरू करण्याबाबत अधिसूचना काढून देखभाल खर्चासाठी 40 टक्के दराने टोल वसूल करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.
स्थानिक नागरिकांना 315 रुपयांचा मासिक पास दर देखील जाहीर केला गेला. या विरोधात मोशीसह डुडुळगाव, चिंबळी, मोई, कुरुळी, चिखली या गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. त्यामुळे रविवारी (दि. 8) ग्रामस्थांनी बैठकीत टोलधाडी विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण 2005 मध्ये होऊन मोशी व चांडोली येथे टोलनाके उभारून टोल वसुली सुरू केली. 2021 मध्ये संपूर्ण खर्च वसूल झाल्याने या रस्त्याची टोल वसुली शासनाकडून बंद करण्यात आली. असे असताना अचानकपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून पुन्हा या दोन्ही ठिकाणी टोलनाके सुरू करण्यात येणार असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.
सेवा रस्ता नाही, रुंदीकरण करण्याबाबत काहीही हालचाल नाही, महामार्गाची दुर्दशा, पादचाऱ्यांसह महिलावर्ग, विद्यार्थ्यांवर रस्त्यावर चालताना अपघाताचे भय, जीवघेणे अपघात, बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबत काहीच निर्णय नाही अशा परिस्थितीत टोल का सुरू करताय, असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांकडून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक खासदार, आमदार यांना निवेदन देऊन 8 दिवसांत यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ या विरोधात व्यापक जन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.