मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला आयोगाने दिले. त्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्यात या घडामोडी घडत असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतरआज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत “आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे.” असे म्हटले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. दरम्यान, विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला याविषयी बोलताना यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्यांचा हा उन्माद हा असाच असणार आहे. आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेलो याची वाट पाहायला कुठे तयार असणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आम्ही याबाबत भूमिका घेणार आहे. सध्या वाद घालण्यात अर्थ नाही. परंतु कार्यालयाचा ताबा घेण्याआधी त्यांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली का? की घुसखोर म्हणून गेलेले आहेत? जर त्यांना परवानगी दिली नसेल तर त्यांनी केलेल्या घुसखोरीवर विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करणार, असे सवाल खासदार अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.
तर सावंत यांच्या टीकेवर “आम्ही विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतलेला नाही तर प्रवेश केला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया बाबी पूर्ण केल्या आहे. हे शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया भरत गोगावले यांनी पूर्ण केली आहे,” अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली.