नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने मिझोराममधील (Mizoram state) मतमोजणी एका दिवसासाठी पुढे ढकलली आहे. यासंदर्भात आयोगाने नवी तारीख जाहीर केली आहे. आता राज्यातील मतमोजणी रविवार 3 डिसेंबर ऐवजी सोमवार 4 डिसेंबर रोजी होणार आहे. वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. (Mizoram election result 2023)
मिझोराम एनजीओ कोऑर्डिनेशन कमिटी (NGOCC) च्या सदस्यांनी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्तावित मतमोजणीच्या तारखेत बदल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी राज्यभर निदर्शने केल्याची माहिती आहे. NGOCC हा प्रभावशाली सेंट्रल यंग मिझो असोसिएशन (CYMA) आणि मिझो जिरलाई पावल (MZP) सह प्रमुख नागरी समाज संस्था आणि विद्यार्थी संघटनांचा एक समूह आहे.(Mizoram News)
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडली. या कालावधीत राज्यातील 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. राज्य निवडणूक आयोग मतमोजणीसाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे.
मतमोजणीसाठी सुरक्षा दल तैनात
पोलिस महासंचालक (डीजीपी) अनिल शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), IRBN आणि मिझोराम सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व ईव्हीएम सर्व जिल्हा मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहेत.