नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारीभाजपाला धूळ चारली. २२४ जागा असणाऱ्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने १३५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाला या निवडणुकीत अवघ्या ६६ जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय संपादन केला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. दोघांनीही या मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसने बैठक बोलावली आहे. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांना या बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. डीके शिवकुमार यांनी स्वत: या बैठकीबाबतची घोषणा केली होती. या घोषणेनंतर काही तासांतच शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. “मला पोटदुखी सुरू झाल्याने मी आज दिल्लीत जाणार नाही,” अशी प्रतिक्रिया डीके शिवकुमार यांनी दिली.
I’ve a stomach infection and will not be travelling to Delhi today, says Karnataka Congress President DK Shivakumar.
There are 135 Congress MLAs. I don’t have any MLAs. I’ve left the decision to the party high command, he adds. pic.twitter.com/xMNVUZ2sHS
— ANI (@ANI) May 15, 2023
“कर्नाटकात काँग्रेसचे १३५ आमदार आहेत. माझ्याकडे एकही आमदार नाही. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? हा निर्णय मी पक्षाच्या हायकमांडवर सोडला आहे,” असे शिवकुमार यांनी कालच सांगितले होते. डीके शिवकुमार यांनी अशाप्रकारे अचानक दिल्ली दौरा रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, डीके शिवकुमार यांनी, ते सोमवारी एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर ते देवदर्शन करून दिल्लीला जातील. यावेळी शिवकुमार म्हणाले होते, “आमच्या हायकमांडने मला आणि खरगे यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावलं आहे. दिल्लीला जाण्यासाठी मला थोडा उशीर झाला आहे. पण जी फ्लाइट उपलब्ध असेल, त्या फ्लाइटने मी दिल्लीला जाणार आहे.” या घोषणेनंतर काही तासांनी डीके शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला.