नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने आज पहाटेच धाड टाकली आहे. त्यांच्या नागपूर येथील घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. अॅड. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात उठबस असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते.
काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने टाकला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंमलबजावणी संचलनालयाने उके यांच्या पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप झाला होता. या दोन फौजदारी गुन्ह्यांमध्ये एक अब्रुनुकसानीचा, तर दुसरा फसवणुकीचा खटला होता. फडणवीसांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.