मुंबई : राज्यात सध्या शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचे दगडं मारून सभा उधळणार असल्याचे वाक्य चर्चेत आहे. त्यांच्या या वाक्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात येत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी “संजय राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारून लोकांच्या सभा उधळून लावणारी लोकं आहोत. त्यामुळे राऊतांनी चॅलेंज करू नये”, असे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊतांनी तुम्ही सभे या मात्र परत कसे जाणार असा सवाल केला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. आज आर.ओ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करतील. त्यामुळे या सभेकडे लागले आहे.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या वाक्यावर प्रतिक्रिया देताना, “तुम्ही दगडं मारून सभा उधळणार आहात. पण ते शिक्षण ज्या शाळेतील मास्तरांकडे घेतलं तेच येणार आहेत ना तिथे सभेला. ती काय दुसरी मंडळी नाहीत. तुमच्याच शाळेतील मुख्याध्यापक येत आहेत”, अशी सूचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे आज जळगावात सभा घेणार आहेत. आधीच्या दोन सभांमध्ये ठाकरेंनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी मुद्द्यांवर सरकारला घेरलं होतं, आज ते कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला टीकास्त्र डागणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.