पुणे – केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघातील विकासाला गती दिली. त्यांचे विकासकामाचे ध्येय-धोरण काटेकोरपणे असल्यामुळे भविष्यात खडकवासला मतदारसंघाचा कायापालट झालेला दिसेल. त्यासाठी महायुतीचे सर्व घटक एकजुटीने, एकदिलाने आणि स्वयंफूर्तीने सहभागी होऊन प्रचार केला असून, आम्हा मतदारांनीही एकजुट दाखवली आहे. त्यामुळे यावेळीही सर्वाधिक मताधिक्य मिळवत “हॅट्ट्रिक’ करणार, असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यामुळे भीमराव तापकीर यांनी धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव, नऱ्हे परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचाराची सांगता केली. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बैठकांचे आयोजन करून तापकीर यांना पाठिंबा दिला. यावेळी नगरसेविका राणी भोसले, रूपाली धावडे, दिगंबर डवरी, रायबा भोसले, दिनेश उर्फ पिंटू धावडे, शिवाजी धनकवडे, संभाजी भोसले, जितेंद्र कोंढरे, विकास लवटे, अमोल म्हस्के, अमोल वागसकर, सतीश अर्जुन, शंकर भोकसे आदी उपस्थित होते.
तापकीर म्हणाले, आतापर्यंत मतदारांनी मला नेहमीच एकजुटीने साथ दिली. त्यामुळे यावेळी खडकवासला मतदारसंघातील कामांना मिळालेली गती कायम ठेवण्यासाठी आणि “स्मार्ट खडकवासला’ अशी ओळख निर्माण करण्यासाठी मला पुन्हा संधी द्यावी. मतदारसंघात मेंट्रोची कामे, रिंग रोड, कचरा व्यवस्थापन, सिंहगड, खडकवासला चौपाटी, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच मतदारस संघाचा गतिमान व सर्वांगिण विकास करण्यासाठी मी यंदाही कटिबद्ध राहील.